इच्छापत्राच्या साक्षीसाठी संजय राऊत न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्रावरून उच्च न्यायालयात सुरू असलेल्या वाद प्रकरणात "सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची साक्ष उच्च न्यायालयात नोंदविण्यात आली. दरम्यान, संजय राऊत यांच्यापाठोपाठ आता हिंदुस्थान टाइम्सचे राजेंद्र अकलेकर, सतीश पाटले आणि मनेका राव या तिघांना साक्षीसाठी बोलवण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्रावरून उच्च न्यायालयात सुरू असलेल्या वाद प्रकरणात "सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची साक्ष उच्च न्यायालयात नोंदविण्यात आली. दरम्यान, संजय राऊत यांच्यापाठोपाठ आता हिंदुस्थान टाइम्सचे राजेंद्र अकलेकर, सतीश पाटले आणि मनेका राव या तिघांना साक्षीसाठी बोलवण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राला त्यांचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. उलट तपासणीदरम्यान बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा घेत उद्धव यांनी हे इच्छापत्र आपल्याला हवे तसे तयार केल्याचा आरोप जयदेव यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आपले नातेसंबंध किती जिव्हाळ्याचे होते, याविषयीचे वृत्त सामना या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानुसार वृत्तपत्राचे संपादक किंवा कार्यकारी संपादकांना साक्षीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आले होते. या मुद्यावर न्यायालयाने 12 प्रश्‍न विचारत संजय राऊत यांची साक्ष नोंदविली. 23 सप्टेंबर 2007, 31 ऑगस्ट 2008 आणि 3 डिसेंबर 2011 या दिवशी "मानो या ना मानो' या सदराखाली जयदेव ठाकरे यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या तीन लेखांची माहिती देत हे सदर दर रविवारी अंदाजे दीड महिना सुरू असल्याची माहिती राऊत यांनी न्यायालयात दिली. तसेच सामना शिवसेनेचे मुखपत्र असून, गेल्या 45 वर्षांपासून आपण शिवसेनेशी संबंधित असल्याचे राऊत यांनी साक्षीत सांगितले. संपादक म्हणून आपल्याला स्वातंत्र असले, तरीही धोरणात्मक निर्णयाच्या प्रसंगी मुख्य संपादक या नात्याने शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत बाळासाहेबांशी आणि आता उद्धव ठाकरे यांच्याशी बोलत असल्याची माहितीही त्यांनी साक्षीदरम्यान दिली.

संजय राऊत गेल्या दोन सुनावणींदरम्यान न्यायालयात साक्ष नोंदवण्यासाठी आले नव्हते. अखेर उच्च न्यायालयाने राऊत यांना चपराक लगावली होती. साक्ष देण्यासाठी नाही आले, तर त्यांना आणावे लागेल, असा इशाराच उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार शेवटी आज संजय राऊत साक्ष देण्यासाठी हजर झाले. दरम्यान, बाळासाहेबांचे इच्छापत्र प्रमाणित करून घेण्यासाठी अनिल परब यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर जयदेव ठाकरे यांनी आक्षेप घेतला. त्यानुसार या मृत्युपत्राबाबत न्या. गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत इच्छापत्रावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणारे डॉ. जलील परकार, शिवसेना नेते अनिल परब यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. जयदेव यांनी या प्रकरणात 34 जणांना साक्षीदार म्हणून बोलवावे, अशी यादी दिली आहे. या सर्वांची उलट तपासणी घेण्याची त्यांची मागणी आहे.

Web Title: Sanjay Raut testament to the witness in court