'महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले, वर्षभरापूर्वीचे दुःख विसरायला ते तयार नाही' - संजय राऊत

तुषार सोनवणे | Wednesday, 18 November 2020

बिहारच्या विकासासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजपनेत्यांची मदत होईल आणि महाराष्ट्रातही शांतता नांदेल अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मुंबई - बिहार निवडणूकांमद्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. भाजपने नितीश कुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले. बिहारच्या निवडणूकीत ज्यांचे नेतृत्व उजळून निघाले ते सर्वात मोठ्या पक्षाचे नेत तेजस्वी विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही सर्वात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले. बिहारच्या विकासासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजपनेत्यांची मदत होईल आणि महाराष्ट्रातही शांतता नांदेल अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

बिहारच्या निवडणूकांमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. दुसऱ्या क्रमांकाचा भाजप स्वतः विजयोत्सव साजरा करीत आहे. राजद पहिल्या क्रमांकाचा शिलेदार आहे. पण दिल्या घेतल्या शब्दास जागून भाजनपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्री पद बहाल केले आहे. या मेहेरबानीच्या ओझ्याखालीच पुढचे दिवस ढकलावे लागतील या चिंतेने नितीशकुमारांच्या चेहऱ्यावरचे तेज उडाले आहे. शिवसेनेच्या दै. सामनामधून संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. 

हेही वाचा - यंदाची ग्रीन दिवाळी, मुंबईत ध्वनी प्रदूषणाचा सर्वात निच्चांक

Advertising
Advertising

नितीशकुमार सलग सात वेळा मुख्यमंत्री झाले ते अशाच तडजोडी करून. भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, ‘‘नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदासाठी शब्द दिला होता, तो पाळला. भाजप हा शब्द पाळणारा पक्ष आहे.’’ महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला नव्हता असे महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले आहेत. त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दुःख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारला असतात. गंमत अशी की, बिहारचे सरकार संपूर्ण पाच वर्षे टिकेल असा आत्मविश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला, त्याच वेळी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर असून ते फार काळ चालणार नाही अशी खदखद व्यक्त करीत आहेत. या ढोंगास काय म्हणावे! बिहारातील भाजप-जदयु सरकारचे बहुमत फक्त दोन-तीन आमदारांचे तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडील बहुमत तिसेक आमदारांचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार पाडण्याची भाषा करणे म्हणजे दगडी भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे आहे. अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

'' देवेंद्र फडणवीस हे निवडणूक काळात बिहारचे प्रभारी होते. फडणवीस यांना बिहार सरकारकडेच जास्त लक्ष द्यावे लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. नितीशकुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले हे ठीक; पण ही कायमस्वरूपी व्यवस्था असेल काय, हा प्रश्नच आहे. मागच्या सरकारात भाजपचे सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्री होते. नितीश यांचे ते खंदे पाठीराखे होते. यावेळी भाजपने नितीशकुमारांचा हा पाठीराखा घरीच बसवला आहे. सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री तर केले नाहीच, पण जास्त आकडय़ाच्या जोरावर भाजपने एक सोडून दोन-दोन उपमुख्यमंत्री नेमले आहेत. त्यामुळे नितीशकुमारांची डोकेदुखी वाढणार आहे. महाराष्ट्रात चंद्रकांत पाटलांसारखे नेते अधूनमधून काही पुडय़ा सोडत असतात आणि महाराष्ट्राचे राज्य शरद पवार चालवत असल्याचे टोमणे मारत असतात. महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच मताचे आहेत. या सगळय़ांनी यापुढे आता बिहारात नितीशकुमारांचे राज्य नक्की कोण चालवेल यावर नजर ठेवली पाहिजे. नितीशकुमार हे नामधारी मुख्यमंत्री असतील व एक दिवस ते इतके अपमानित होतील की, त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल. नितीशकुमार यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले की, आपल्याला यावेळी मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण भाजपच्या आग्रहाखातर आपण ते पद स्वीकारत आहोत. भाजपच्या कर्तबगारीची ही कमालच म्हणावी लागेल किंवा फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे मोदी साहेबांचे बिहारवर विशेष प्रेम आहे. ते आता स्पष्टच दिसते. महाराष्ट्रात भाजपच्या जागा जास्त निवडून आल्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले नाही, पण बिहारात तिसऱया क्रमांकावर घसरलेल्या पक्षाला मुख्यमंत्रीपदाचा मुकुट बहाल केला. काय हे औदार्य! राजकारणातल्या या त्यागाचे वर्णन करायला शाई अपुरी पडेल, पण नितीशकुमार या मेहेरबानीच्या ओझ्याखाली किती काळ तग धरतील? की एक दिवस स्वतःच हे ओझे फेकून देतील व नवा रस्ता स्वीकारतील? समोर तेजस्वी यादवांचे आव्हान उभेच ठाकले आहे व विधानसभेत 110 आमदारांची भिंत पार करणे सोपे नाही. ''

हेही वाचा - पालघर साधू हत्येप्रकरणी भाजप आक्रमक; प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी

''तेजस्वी यादव हे तरुण, मिश्कील व बोचरी टीका करणारे नेते आहेत. नामधारी मुख्यमंत्री झाल्याबद्दल तेजस्वी यांनी नितीशकुमारांना शुभेच्छा दिल्या आहेत. खुर्चीच्या महत्त्वाकांक्षेऐवजी बिहारच्या जनतेच्या आकांक्षा आणि 19 लाख नोकऱया, रोजगार, शिक्षण, औषध, उत्पन्न आणि सिंचन यावर दिलेली आश्वासने पूर्ण करा असे तेजस्वी नव्या मुख्यमंत्र्यांना म्हणाले. तिकडे चिराग पासवान यांनीही नितीशकुमारांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची शंका रास्त आहे. बहुमत आहे, पण ते भक्कम नाही. भाजप काँग्रेसचे आमदार फोडण्याच्या तयारीत आहे. हे आमदार ‘जदयु’पेक्षा भाजपातच सामील करायचे व आकडा वाढवून नितीशकुमारांना दबावात आणायचे असे घडू शकेल. काँग्रेसची कामगिरी सुमार झाली त्याचे खापर फक्त राहुल गांधींवर फोडणे योग्य नाही. नितीशकुमार यांची कामगिरी तरी कुठे चमकदार झाली? ज्यांची कामगिरी ठसठशीत व चमकदार झाली असे तेजस्वी यादव मात्र विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही सगळय़ात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे. बिहारच्या विजयाचा आनंद भाजपने पुढची चार वर्षे साजरा करीत राहावे. बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी. त्यामुळे बिहारला फायदा होईल, पण महाराष्ट्रातही शांतता नांदेल. नितीशकुमारांना आमच्या शुभेच्छा!'' असे राऊत यांनी म्हटले आहे.