शाळा परिसरात विद्यार्थ्याची हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

सरळगाव (ता. मुरबाड) - नांदेणी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्याची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेची नोंद मुरबाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. नांदेणी या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सूरज जानेश्‍वर भोईर (वय 9) हा चौथीच्या वर्गात शिकत होता. सकाळी सूरज हा नेहमीप्रमाणे शाळेत आला होता. तो शाळेच्या बाजूलाच लघुशंकेसाठी गेला होता. तो बराच वेळ परत न आल्याने त्याचा शोध घेतला असता शाळेच्या बाजूलाच त्याचा मृतदेह सापडला असून, त्याच्यावर वार करण्यात आले आहेत. शाळेतील शिक्षकांनी या घटनेची माहिती मुरबाड पोलिस ठाण्यात दिली. निरीक्षक अजय व्हावे यांनी नांदेणी येथे धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.

याप्रकरणी मुरबाड पोलिस तपास करत आहेत. सूरज हा या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याचे समजते. सूरजची हत्या करणारा फरारी झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: saralgaon mumbai news student murder