ब्राह्मण युवकांनी उद्योजकतेकडे वळावे - डॉ. आशुतोष रारावीकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

सातपूर - दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या पतधोरणात मोठ्या व लघुउद्योगाला चालना देण्यासाठी कोणतेही तारण न घेता पन्नास हजारांपासून ते दहा लाख व पुढे एक कोटीचे कर्ज घेता येणार आहे. त्याबाबतचे सर्व निर्देश बॅंकांना देण्यात आले आहेत. यात सर्वसाधारण घटकांचाही समावेश असल्याने ब्राह्मण समाजातील नवउद्योजकांनी या संधीचा फायदा घेऊन उद्योग क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन रिझर्व्ह बॅंकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर यांनी रविवारी (ता. 11) "बीबीएनजी'च्या परिवर्तन परिसंवादात केले.

ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलच्या (बीबीएनजी) राष्ट्रीय परिषदेत पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. परिसंवादाच्या उद्‌घाटन प्रसंगी संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीपकुमार झा, "बीबीएनजी'चे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, विराज लोमटे आदी उपस्थित होते.

तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सरकारी व खासगी क्षेत्रातील नोकऱ्या झपाट्याने कमी होत जाणार आहेत. ही जरी परिस्थिती असली, तरी यातून मार्ग काढण्यासाठी स्वयंरोजगार हाच राजमार्ग आहे, असे मत रारावीकर यांनी मांडले.

भाजप प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले, की आपले राज्य सुरळीत चालण्यासाठी ब्रिटिशांनी ब्राह्मण समाजासह सर्व समाजांत भांडणे लावली आहेत. आता आपण ही जुनी ओझी उतरवून भविष्याकडे वाटचाल करावी. सायंकाळी प्रतिष्ठेच्या जीवनगौरव व उद्यम कौस्तुभ पुरस्काराचे भांडारी, लक्ष्मण सावजी, विसुभाऊ बापट आदींच्या हस्ते वितरण करण्यात आले.

पुरस्कारांचे मानकरी
यंदाचा जीवनगौरव पुरस्कार भारत-इस्राईल संबंधाचे जनक 92 वर्षीय एन. बी. एच. कुलकर्णी यांना देण्यात आला. उद्यम कौस्तुभ पुरस्कार पुण्याचे कंपनी सेक्रेटरी मकरंद जोशी, नाशिकचे उद्योजक नितीन केळकर, औरंगाबादचे शासकीय कंत्राटदार विवेक देशपांडे, चितळे उद्योगसमूहाचे विश्‍वास चितळे व उद्योजकता विकास क्षेत्रात काम करणारी पुण्याची सामाजिक संस्था "दे आसरा' यांना देण्यात आला.

Web Title: satpur news nashik news brahman youth business dr ashutosh raravikar