
Mumbai News : विजेची बचत करा, अतिरिक्त वीज बिल टाळा
मुंबई : राज्यासह मुंबईतील वाढते तापमान आणि गर्मीमुळे विजेचा वापरही वाढला आहे. त्यामुळे एसी, फ्रीज, पंखा यांसारख्या वातानुकूलित सयंत्रांचा वापरही वाढला आहे. यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे वीज वितरण कंपन्यांना वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे.
तर ग्राहकांना ही यामुळे वीजबिल वाढीव येत आहे. वीजेची बचत व्हावी यासाठी वीज कंपन्यांकडून जनजागृती करण्यात येत आहे. एसीचा वापर करताना त्याची नियमितपणे सर्व्हिसिंग करा. एसीचा फिल्टर स्वच्छ करा आणि नियमित बदला. ५ स्टार रेटिंग असणारा एसी विकत घेण्यास प्राधान्य द्या. एसी कायम २४° सेल्सिअस वर ठेवा. गरज नसेल तेव्हा एसी रिमोटने नव्हे तर थेट बंद करा. वातानुकूलित यंत्र म्हणजेच एसीला पंख्याच्या तुलनेत ९पट अधिक वीज लागते. त्यामुळे शक्य असल्यास पंखा लावण्यास प्राधान्य द्यावे.
अनावश्यक वेळी पंखा, टीव्ही, इस्त्री, मोबाईल चार्जर यांसारखी विजेवर चालणारी उपकरणे बंद ठेवा. मोबाईल चार्जिंग पूर्ण होताच मुख्य बटन बंद करा. वीजबिल कमी येण्यासाठी फ्रीजची वेळोवेळी सर्व्हिसिंग करा. त्याचे रबर आणि कॉइल व्यवस्थित असल्याची खात्री करा, या उपाययोजना केल्यास विजेची बचतही होईल आणि वीज बिलातही बचत होऊ शकते.
उन्हाळ्याच्या सुटयात अधिक काळासाठी बाहेरगावी जात असल्यास
घरातुन निघण्याआधी सगळे स्वीच बंद असल्याची खात्री करा.
बाहेर जाताना फ्रिज, मिक्सर यांसारखी उपकरणे जरूर बंद करा.
घरातुन निघताना मेन स्विच बंद करायला विसरू नका.