दिवाळीत पर्यावरण सांभाळण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

मुंबई - फटाक्‍यांमुळे वायू व ध्वनिप्रदूषण होते. त्यामुळे मी फटाक्‍यांच्या विरोधातच आहे. कमीत कमी प्रदूषण करणारे फटाके मी यंदा माझ्या मुलीसाठी आणले आहेत. दिवाळीचा सण

मुंबई - फटाक्‍यांमुळे वायू व ध्वनिप्रदूषण होते. त्यामुळे मी फटाक्‍यांच्या विरोधातच आहे. कमीत कमी प्रदूषण करणारे फटाके मी यंदा माझ्या मुलीसाठी आणले आहेत. दिवाळीचा सण

साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन अभिनेता सुशांत शेलार याने "सकाळ'शी बोलताना केले. दिवाळीला कुटुंबासोबत राहण्याचा मी दर वर्षी प्रयत्न करतो. आमच्या नाट्य-चित्रपट क्षेत्रात लग्न, मुंज किंवा काहीही घरगुती कार्यक्रमांसाठी सुट्या नसतात. त्यामुळे किमान दिवाळीला तरी कुटुंबाबरोबर वेळ घालवावा, अशी माझी इच्छा असते. पूर्वी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नाटकाचा प्रयोग असला, की त्या दिवशीचे मानधन मिळायचे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काहीतरी काम करून आपण लक्ष्मी घरात आणली, याचा आनंद होत असे. तेव्हा घरी त्या पाकिटाची पूजा केली जायची, अशी आठवणही सुशांतने सांगितली.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण कारीट पायाने फोडतो. आपल्यातील वाईटपणा, कडवटपणा यांचा संहार करावा, याचे ते प्रतीक आहे. पाडव्याला आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो आणि जुने मागे ठेवून नवीन आयुष्याला सुरुवात करतो. भाऊबीज हा दिवस म्हणजे पूर्ण आनंदाचा दिवस आहे. दिवाळी नेहमी पारंपरिक पद्धतीनेच साजरी व्हायला पाहिजे असे मला वाटते, असे तो म्हणाला. आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. पार्ट्या, डीजे ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे आपले सण भारतीय संस्कृतीप्रमाणेच साजरे झाले पाहिजेत.

माझ्या मुलीने यंदा पुठ्ठ्याचा कंदील बनवला आहे. कोणत्याही प्रकारची चीनी बनावटीची उत्पादने आम्ही आणलेली नाहीत, आणणारही नाही. लोक आमच्याकडे आदर्श म्हणून बघतात. आम्हीच काही गोष्टी पाळल्या नाहीत, तर मग उगाच सामाजिक भान राखणारे सेलीब्रिटी कशाला म्हणवून घ्यायचे, असा सवालही त्याने केला.

स्वदेशी उत्पादनेच घ्या
एकाने विचार करून परदेशी उत्पादन घ्यायचे नाही, असे ठरवले तर कितीतरी लोक असा विचार करतील. आपल्या देशातील पैसा आपल्याकडेच राहील. त्यामुळे वस्तू खरेदी करतानाही लोकांनी विचार केला पाहिजे. लोकांना हे भान या दिवाळीच्या निमित्ताने येवो, असे सुशांत शेलार म्हणाला.

Web Title: Save Environment in Diwali celebration