सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या उत्पन्नात घसघशीत वाढ

शर्मिला वाळुंज
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह गेल्या वर्षी दुरुस्ती व इतर कामांसाठी बंद असल्यामुळे चर्चेत राहिले होते. नाट्यगृह बंद राहिल्याने उत्पन्नात घट होऊन पालिका प्रशासनाला तोटा सहन करावा लागला होता; परंतु जुलै महिन्यात नाट्यगृह सुरू झाले आणि परिस्थिती सुधारताच अवघ्या पाच-सहा महिन्यांच्या कालावधीत नाट्यगृहाने सुमारे 54 लाख 83 हजार रुपये उत्पन्न मिळविले आहे. 

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह गेल्या वर्षी दुरुस्ती व इतर कामांसाठी बंद असल्यामुळे चर्चेत राहिले होते. नाट्यगृह बंद राहिल्याने उत्पन्नात घट होऊन पालिका प्रशासनाला तोटा सहन करावा लागला होता; परंतु जुलै महिन्यात नाट्यगृह सुरू झाले आणि परिस्थिती सुधारताच अवघ्या पाच-सहा महिन्यांच्या कालावधीत नाट्यगृहाने सुमारे 54 लाख 83 हजार रुपये उत्पन्न मिळविले आहे. 

कोरोना नव्हे, थंडीमुळे मासे महागले...

वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यामुळे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह 8 सप्टेंबर 2018 पासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले होते. या कालावधीत आधुनिक वातानुकूलित यंत्रणा नाट्यगृहात बसविण्यात आली. तसेच आसनव्यवस्था व स्वच्छतागृहही सुधारण्यात आले.

जुलै महिन्यात दुरुस्तीनंतर नाट्यगृहाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत रसिकांसाठी ते खुले करण्यात आले. त्यानंतरही सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी हे नाट्यगृह काही कालावधीसाठी पुन्हा बंद ठेवण्यात आले होते. या सर्व गोष्टींमुळे कलाप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण होते. तसचे या सर्वांचा पालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला. 

कल्याण-डोंबिवलीकरांची उन्हाळी वणवण थांबणार

या सर्व अडथळ्यांवर मात करीत प्रशासनाने नाट्यगृहात जास्तीत जास्त कार्यक्रम कसे होतील, याकडे लक्ष देत उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून जुलै ते डिसेंबर 2019 या कालावधीत 45 लाख 49 हजार 795 रुपयांचे उत्पन्न नाट्यगृहाला मिळाले आहे. केवळ डिसेंबर महिन्यातच नाट्यगृहाने 16 लाख 81 हजाराचे उत्पन्न मिळविले आहे.

तसेच जानेवारीत 9 लाख 34 हजार 173 उत्पन्न कलामंदिराने मिळविले आहे. अशा प्रकारे नाट्यगृहाने गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत 54 लाख 83 हजार 968 रुपयांचे उत्पन्न मिळवल्याने नाट्यगृह प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

डिसेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी शालेय स्नेहसंमेलनांचा असतो. 2018 ला याच काळात नाट्यगृह बंद असल्याने शाळांमध्येही नाराजीचे वातावरण होते. यंदा मात्र त्याची भरपाई झाली असून सध्या शाळा महाविद्यालयांचेच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सादर होत आहेत. नाट्यगृहाचीही डागडुजी होऊन ते सुसज्ज झाल्याने नाट्यसंस्थांमध्येही समाधानाचे वातावरण असून नाटकांच्या प्रयोगांतही वाढ झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

दुरुस्तीसाठी नाट्यगृह बऱ्याच कालावधीसाठी बंद असल्याने रसिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. बंदच्या कालावधीत नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात आली असून सुसज्ज असे नाट्यगृह पाहून रसिक व कलाकार खूष आहेत. आधुनिक वातानुकूलित यंत्रणा येथे बसविण्यात आल्याने आता रसिकांची ती नाराजीही दूर झाली आहे. नाट्यगृहाचे या बदलत्या स्वरूपामुळे उत्पन्नवाढीस हातभार लागला आहे. 
- दत्तात्रय लधवा, व्यवस्थापक 
सावित्रीबाई फुले नाट्यगृह 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai fule Natyagruhas Income increases