सावित्रीबाईंच्या विचाराचं नातं सांगणारी दीदी

भाईंदर - आरतीचे व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी. चौकटीत आरती वाढेर.
भाईंदर - आरतीचे व्याख्यान ऐकताना विद्यार्थिनी. चौकटीत आरती वाढेर.

वसई - बाईच्या पायातील अज्ञानरूपी बेडी तोडण्याचं काम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं. ती शिकली, लढायला लागली, जगायला मुक्त झाली; पण या ना त्या रूपात तिच्याभोवतीचं काटेरी कुंपण कायम राहिलं. हे टोचणारं, रक्तबंबाळ करणारं कुंपण उपटून टाकण्याचं काम आता सावित्रीच्या लेकींनी हाती घेतलं आहे. सावित्रीबाईंशी रक्ताचं नसलं तरी विचाराचं नातं सांगणारी आरती वाढेर अशीच एक सावित्रीची लेक. या तरुणीने मुली, महिलांना सर्व प्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी साक्षर करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ती राज्यभर फिरतेय, नवे कार्यकर्ते घडवतेय. 

आरतीच्या व्याख्यानांची संख्या पाचशेवर पोहचली असून, हजारो जणींना तिने नवं बळ दिलं आहे. नालासोपाऱ्यातील आरतीने ७ ऑगस्ट २०१५ ला पहिले व्याख्यान दिले आणि १२ जानेवारीला ती पाचशेचा पल्ला गाठणार आहे. मुलींना मोकळेपणाने समस्या मांडता याव्यात, यासाठी तिने हेल्पलाईन सुरू केली आहे.

आरती म्हणाली,  ‘ग्रामीण भागात वेगळाच प्रश्‍न जाणीवच्या नजरेस आला, तो म्हणजे आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींची संवादाअभावी होणारी मानसिक कुचंबणा. या मुलींना विश्‍वासात घेतल्यावर त्यांनी केलेला प्रश्‍नांचा भडिमार ऐकून त्यांचा घरातील संवाद किती तोकडा आहे, हे समजले. मुलींना समाजाची भीती, घरचे काय म्हणतीय, या भीतीने समस्या, आपले म्हणणे मांडत नाही. मुलींना मोकळा श्‍वास मिळेपर्यंत हा प्रवास सुरूच ठेवणार आहे.

महाराष्ट्रातील चळवळ
नागपूर, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, अमरावती, नाशिक, लातूर, कुडाळ, सोलापूर, पालघर जिल्हा भाईंदर, दहिसर या ठिकाणी जावून आरती व तिचे सहकारी मुलींना व्याख्यान देत आहेत.

सावित्रीबाई फुले यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत मुलींच्या शिक्षणासोबत त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले. मुलगा-मुलगी समाजात समान काम करू शकतात; मात्र मुलींना पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. यासाठी माझा प्रयत्न आहे आणि ज्या मुलींचा श्‍वास कोंडत आहे त्यांना भयमुक्त वातावरणात आणण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. 
- आरती वाढेर, जाणीव संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com