एसबीआयला 4876 कोटींचा तोटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

स्टेट बॅंक ऑफ इंडियाला जूनअखेर संपलेल्या तिमाहीत 4,875.85 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. थकीत कर्जांचे वाढते प्रमाण आणि बॅंकेचे वाढते खर्च यामुळे सलग तिसऱ्या तिमाहीत बॅंकेने तोटा नोंदवला आहे.

मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडियाला जूनअखेर संपलेल्या तिमाहीत 4,875.85 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. थकीत कर्जांचे वाढते प्रमाण आणि बॅंकेचे वाढते खर्च यामुळे सलग तिसऱ्या तिमाहीत बॅंकेने तोटा नोंदवला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बॅंकेला 2,005.53 कोटी रुपयांचा नफा झाला होता. विश्लेषकांना स्टेट बॅंक इंडियाला 237 कोटी रुपयांचा नफा होण्याची अपेक्षा होती.

स्टेट बॅंक इंडियाच्या तरतूदी आणि आकस्मिक खर्चात 115.33 टक्कयांची वाढ होत ते 19,228.26 कोटी रुपयांवर पोचले आहेत. गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत बॅंकेचा तरतूदी आणि आकस्मिक खर्च 8,929.48 कोटी रुपये होता. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एकूण अनुत्पादीत मालमत्तेत (एनपीए) 13.17 टक्क्यांची वाढ होत जूनअखेर ती 2.13 ट्रिलियन रुपयांवर पोचली आहे. मागील वर्षी अनुत्पादीत मालमत्ता 1.88 ट्रिलियन रुपये होती. एकूण कर्जाच्या प्रमाणात बॅंकेच्या एनपीए प्रमाण 10.69 टक्क्यांवर पोचले आहे. बॅंकेने कर्जातून मिळवलेल्या उत्पन्नात 23.8 टक्क्यांची वाढ होत 21,798.36 कोटी रुपयांवर पोचले आहे.

गेल्या वर्षी हेच उत्पन्न 17,606.07 कोटी रुपये होते. त्याशिवाय बॅंकेचे इतर उत्पन्न 6,679.49 कोटी रुपये आहे. त्यात 16.57 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी इतर उत्पन्नातून मिळालेली रक्कम 8,005.66 कोटी रुपये इतकी होती. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात एसबीआयचा शेअर 304.45 रुपये प्रति शेअर या किंमतीवर होता.

Web Title: SBI suffers 4876 crore loss