'बबड्याच्या हट्टापायी' शेलारांची ठाकरे सरकारवर बोचरी टीका, विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

पूजा विचारे
Friday, 28 August 2020

अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द न करता त्या होणारच असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे. 

मुंबईः अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द न करता त्या होणारच असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेऊन परीक्षा रद्द करण्याची मागणीनं गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात येत होती. अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द न करता त्या होणारच मात्र त्यासंदर्भात तारखा ठरवण्याचे निर्देश प्रत्येक राज्यांना देण्यात आलेत. UGC ने दिलेल्या तारखांना परीक्षा घेता येणार नसतील तर नवीन तारखा UGC सोबत चर्चा करून ठरवण्यात याव्यात आणि जाहीर कराव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे. यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे. 

भाजप आमदार ॲड. आशिष शेलार यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही.
शिक्षण तज्ञांची मते धुडकावली. युजीसीला जुमानले नाही. मंत्री मंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले?असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला.

 

एका "बबड्याच्या" हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार...! ऐकतो कोण? सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!, असा खोचक टोला ही शेलार यांनी सरकारला लगावला आहे. 

 

महाराष्ट्रातील "पाडून दाखवा सरकारने" स्वतःच्या अहंकारातून  स्वतःच 
तोंडावर पडून दाखवले!, पण विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका. परिस्थितीला धैर्याने समोरे जाऊ या. यश तुमच्या वाट्याला नक्की येईल...तुमचे भविष्य उज्वलच आहे!!, असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

 

आज पदवी परीक्षांसंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.  परीक्षा रद्द न होता त्या घेण्याचा निर्देश देण्यात आलेत. UGC नं दिलेल्या गाईडलाइन्स योग्य असल्यानं अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार आहे.  मात्र त्या UGCनं दिलेल्या तारखांना घेण्याबाबत प्रत्येक राज्यांना स्वातंत्र देण्यात आलं आहे. नवीन तारखा अथवा परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलायच्या असल्यास UGC सोबत चर्चा करून नवीन तारखा जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेत.

SC exam verdict bjp mla ashish shelar attacks thackeray government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SC exam verdict bjp mla ashish shelar attacks thackeray government