Mumbai University Recruitment : डेटा एन्ट्री ऑपरेटरचा थेट कुलसचिव

मुंबई विद्यापीठाचा पदभरतीतील प्रताप
scam fraud in recruitment Data Entry Operator process for post of Vice-Chancellor in Mumbai University
scam fraud in recruitment Data Entry Operator process for post of Vice-Chancellor in Mumbai University sakal

मुंबई : परीक्षा आणि निकालासंदर्भात कायमच चर्चेत राहिलेल्या मुंबई विद्यापीठात उप-कुलसचिव पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचे समोर आले आहे. केवळ डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रोग्रॅमर पदाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला थेट मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पुढे हाच व्यक्ती जळगाव विद्यापीठात कुलसचिव पदापर्यंत जाऊन पोहोचला.

मुंबई विद्यापीठात २०११-१२ दरम्यान विनोद पाटील यांची विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; त्यावेळी पाटील यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून ४ वर्षे ७ महिने आणि प्रोग्रॅमर म्हणून ११ वर्षे ६ महिने अनुभव होता. हा अनुभव उप-कुलसचिव पदासाठी अनुभव प्रमाणसंहिता १९८४ च्या तरतुदीनुसार समकक्ष नाही, असा स्पष्ट शेरा विद्यापीठात झालेल्या विविध पदांच्या नियुक्ती अहवालात दिला आहे. हा अहवाल ‘सकाळ’च्या हाती लागला असून त्यात अनेक आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. मुंबई विद्यापीठाने पाटील यांच्याप्रमाणे टंकलेखक, डेटा एन्ट्री ऑपरेटर आदी पदांवरील व्यक्तींचीही उप-कुलसचिव पदावर नियुक्ती केली आहे. याची चौकशी करण्याची मागणी माजी सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी केली.

१८ जण नियमबाह्य उप-कुलसचिवपदी!

मुंबई विद्यापीठाने उप-कुलसचिव पदासाठी आवश्यक असलेला अनुभव आणि नियमावली धाब्यावर बसविली आहे. विद्यापीठाने अनेक टंकलेखक, लघुलेखक, खासगी कंपनीतील लिपिक- संगणक अधिव्याख्याता, मुख्याध्यापक, मानधन तत्त्वावरील जिल्हा प्रकल्प अधिकारी, समन्वयक, लेखा सहायक, असा अनुभव असलेल्या तब्बल १८ जणांना उप-कुलसचिवपदी नियुक्ती केली आहे. यासंदर्भातील अहवाल नुकताच उच्च शिक्षण विभाग आणि मुंबई विद्यापीठाकडे उपलब्ध असून त्यावर विद्यापीठ प्रशासन मौन बाळगून आहे. दरम्यान, या गैरप्रकारावर कोणतीही कारवाई करायची नाही, अशी भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

२०११-१२ मध्ये मी मुंबई विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून रुजू होताना माझ्याकडे प्रोग्रॅमर पदाचा अनुभव होता, शिवाय हे पद वर्ग-एकमध्ये होते. मी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र त्यानंतर सादर केले आहे.

- विनोद पाटील, कुलसचिव, जळगाव विद्यापीठ

विनोद पाटील यांना परीक्षा नियंत्रक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला. त्यावेळी त्यांचा अनुभव लक्षात घेण्यात आला होता. आता ते त्या पदावर नसून जळगाव विद्यापीठात कुलसचिव पदावर रुजू झाले आहेत.

- सुनील भिरुड, प्रभारी कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com