सीईटी सेलकडून १४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

विविध अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या १४ परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी (ता. ४) जाहीर झाले. 

मुंबई : विविध अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या १४ परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी (ता. ४) जाहीर झाले. सर्वांत महत्त्वाची मानली जाणारी एमएचटी-सीईटी १३ ते २३ एप्रिलदरम्यान होईल. एमबीए-सीईटी १४ आणि १५ मार्चला होणार आहे. एलएलबी तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी २८ जूनला आणि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी १२ एप्रिलला होईल.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आणि प्रवेश नियंत्रण प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले. त्यानुसार अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची एमएचटी-सीईटी पुढील वर्षी १३ ते २३ एप्रिल या कालावधीत होईल. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. 

तीन व पाच वर्षांचे विधी अभ्यासक्रम, बीई-बीटेक, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट, बीपीएड-एमपीएड, बीए-बीएस्सी-बीएड इंटिग्रेटेड कोर्स आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकावरच विश्‍वास ठेवावा, 
असे आवाहन सीईटी सेलचे आयुक्‍त संदीप कदम यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schedule of 14 exams released by CET Cell