शाळकरी मुलेही आईबरोबर बॅंकेसमोर ताटकळली

mumbaicrowd
mumbaicrowd

मुंबई - दिवाळीची सुटी संपल्यानंतर मंगळवारी (ता. 15) शाळेचा पहिला दिवस उजाडला; पण आई-बाबा नोटा मिळविण्याच्या विवंचनेत असल्याने बच्चेकंपनीचा हिरमोड झाला. "शाळा सुटली पाटी फुटली... आई मला भूक लागली' असे म्हणत आनंदाने शाळेबाहेर आलेल्या चिमुकल्यांच्या नशिबी आज आई-बाबांबरोबर बॅंकेच्या रांगेत उभे राहणेच आले. नोटा मिळविण्यासाठी मुंबईकरांचा चाललेला खटाटोप मंगळवारी पाचव्या दिवशीही सुरू होता.

एरवी "आधी पोटोबा, मग विठोबा' असे मुलांना बजावणाऱ्या आया आज "आधी नोटपूजा, मग पोटपूजा' असे मुलांना सांगून त्यांच्याबरोबर भरदुपारी तळपत्या उन्हात बॅंकेबाहेरील रांगेत उभ्या राहिल्या. काही जाणती मुले शक्कल लढवत आईऐवजी स्वतः रांगेत उभी राहिली. त्यांनी आईला घरी पाठवले आणि तासाभराने नंबर जवळ आल्यावर फोन करून बोलावून घेतले. मग आईने मुलाला जेवायला घरी पिटाळले आणि उपाशीपोटी पुन्हा रांग लावली. असे चित्र आज अनेक ठिकाणी होते.

बॅंकांना सोमवारी सुटी असल्याने अनेकांचा खोळंबा झाला. साहजिकच आज सकाळपासूनच बॅंकांसमोर लागलेल्या रांगा वाढत गेल्या. परिणामी पैसे हातात पडायला दोन-अडीच तास लागत होते. आजपासून बॅंकेच्या अनेक छोट्या शाखांमध्येही शंभराच्या नोटा मर्यादित प्रमाणात देण्यास सुरुवात झाली. एक-दोन दिवसांत पाचशेच्या नोटाही मिळू लागतील व एटीएम यंत्रेही सुरू होतील, असा दिलासा बॅंक कर्मचारी देत असल्याने उद्या तरी पैसे मिळतील, अशा आशेवर खातेदार हाती आलेल्या तुटपुंज्या रकमेच्या नोटा स्वीकारीत होते.

आजही अनेक खातेदार कामधंदा सोडून बॅंकांच्या रांगेत उभे होते. नोटांसाठी लागलेल्या रांगा रविवारपेक्षाही मोठ्या झाल्याचे दिसत होते. बॅंक कर्मचारी सोमवारच्या सुटीमुळे विश्रांती मिळाल्याने थोडे ताजेतवाने झाले असले तरी खातेदार मात्र रोज रोज रांगा लावून कंटाळल्याचे जाणवले. रोज जेमतेम दोन-अडीच हजारच मिळत असल्याने जास्त पैशांसाठी सारखे बॅंकेत येणे भागच आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. आज अडीच हजार रुपये काढता येतील, असे सांगितले गेले असले, तरी छोट्या सहकारी बॅंकांमधून बावीसशे रुपयेच देण्यात आले.

बदली केंद्रे वाढवा
केईएम रुग्णालयाच्या आवारात आज रुग्णांच्या नातलगांसाठी राज्य सरकारच्या सूचनेवरून नोटा बदलण्याचे केंद्र सुरू झाले. अशीच जास्तीत जास्त केंद्रे अन्यत्र सुरू करावीत, अशी मागणीही नागरिकांनी यानिमित्ताने केली.

काळ्या पैशांचा सदुपयोग करा
ज्या महाभागांना आपला काळा पैसा पांढरा करता येत नाही, त्यांनी त्या नोटा नष्ट करू नयेत. त्या नोटांचा सदुपयोग व्हावा म्हणून सरकारने निनावी दानपेट्यांसारखी व्यवस्था करावी. तिथे जमा झालेल्या नोटा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नातलगांना किंवा सैनिकांना किंवा गरिबांना द्यावा, अशा सूचनाही नागरिक मोठ्या प्रमाणावर करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com