अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना कमाल पाच दिवस निवडणुकीचे काम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोग अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी बोलावू शकतो. या कर्मचाऱ्यांना केवळ मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी काम देता येते. त्याचप्रमाणे तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांना बोलावू शकतो.

मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोग अनुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या काळात केवळ पाच दिवस कामासाठी बोलावू शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 12) दिला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोग अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी बोलावू शकतो. या कर्मचाऱ्यांना केवळ मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी काम देता येते. त्याचप्रमाणे तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांना बोलावू शकतो. त्यामुळे निवडणूक आयोगाला अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना कमाल पाच दिवस कामासाठी बोलावण्याचा अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

मालाड कॉस्मोपॉलिटन एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्ट, मालाड कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन ट्रस्ट आदी शैक्षणिक संस्थांच्या वतीने ऍड. दिलीप बागवे यांनी केलेल्या रिट याचिकांवर शुक्रवारी न्या. अभय ओक आणि न्या. एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठाने निकालपत्र जाहीर केले.

Web Title: School Employee Election Work