बंद पडलेल्या शाळा पुन्हा गजबजल्या!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

शाळांच्या दुरुस्तीसाठी शेट्टी यांनी तब्बल १० लाख खर्च केले. ग्रामस्थांनीही शाळांच्या दुरुस्तीसाठी श्रमदान केले...

नवी मुंबई - सध्याच्या धावपळीत एकमेकांकडे पाहण्यासाठीही वेळ नसताना सामाजिक कार्यकर्ते के. डी. शेट्टी यांनी खालापूर तालुक्‍यातील दोन आदिवासी पाड्यांतील शाळांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. दुरवस्थेमुळे या शाळा बंद पडल्या होत्या. कोणालाही कंत्राट न देता स्वतः शेट्टी आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून या शाळांची दुरुस्ती केली. वर्षभर बंद पडलेल्या या शाळा २६ जानेवारीपासून पुन्हा सुरू झाल्या.

खालापूर तालुक्‍यातील भिलवले आणि भिलवले ठाकूरवाडी असे दोन आदिवासी पाडे आहेत. शहरापासून दूरवर असल्याने या शाळेच्या दुरवस्थेकडे कायमच दुर्लक्ष झाले. त्यामुळे या दोन्ही पाड्यांवर सुरू असलेल्या प्राथमिक शाळा दुरवस्थेमुळे बंद पडल्या होत्या. शेवाळलेल्या भिंती, किचनचा तुटलेला दरवाजा, छतातून गळणारे पाणी, पावसामुळे गळके झालेले छप्पर अशी अवस्था या दोन्ही शाळांच्या इमारतींची झाली होती. यातच शाळेला दरवाजा नसल्याने मोकाट प्राण्यांनी इमारतींचा आसरा घेतला होता.

के. डी. शेट्टी ऑक्‍टोबर २०१६ मध्ये मित्रांसोबत काही कामानिमित्त सायन-पनवेल महामार्गावरील चौक येथे खालापूरला जाण्याचा रस्ता विचारत होते. त्या वेळी त्यांना वाटेत भेटलेल्या एका अनोळखी व्यक्तीने रस्ता सांगून खालापूरपर्यंत सोडण्याची विनंती केली. शेट्टी यांनी त्यांना गाडीतून खालापूरपर्यंत सोडले. मुरलीधर पालवे ही ती व्यक्ती. प्रवासादरम्यान शेट्टी यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. आपण दुर्गम भागातील शाळांत मुलांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहचवण्याचे काम करत असल्याचे पालवे यांनी शेट्टी यांना सांगितले. कधी मदत लागल्यास जरूर कळवा, असे शेट्टी त्यांना म्हणाले. ही चर्चा लक्षात राहिल्याने पालवे यांनी शेट्टी यांना काही दिवसांनी भिलवले व भिलवले ठाकूरवाडी येथील शाळांच्या दुरवस्थेबाबत माहिती देत मदतीसाठी विनंती केली. त्यावर शेट्टी यांनी काही क्षणांत होकार दिला. प्रत्यक्ष शाळांची पाहणी करून तत्काळ दोन लाखांचा धनादेश शेट्टी यांनी दिला. केवळ आर्थिक मदत करून न थांबता त्यांनी शाळेच्या कामात श्रमदानाचीही इच्छा व्यक्त केली.

शाळांच्या दुरुस्तीसाठी शेट्टी यांनी तब्बल १० लाख खर्च केले. त्यांची ही उदारता पाहून भिलवले व भिलवले ठाकूरवाडी येथील ग्रामस्थांनीही शाळांच्या दुरुस्तीसाठी श्रमदान केले. २५ जानेवारीला दुरुस्ती पूर्ण झाली. शेट्टी यांच्याच हस्ते या शाळांचे उद्‌घाटन झाले. त्यामुळे वर्षभर बंद पडलेल्या या शाळा पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या.

दुर्गम भागातील शाळांकडे अनेकदा प्रशासनाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहतात. अशा शाळांसाठी सर्वांनीच मदत करण्याची गरज आहे. आपल्या मदतीमुळे कोणाचे भले होत असेल, तर त्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत.
- के. डी. शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते.

Web Title: school start again