शाळांचा लेखाजोखा पोर्टलवर

वेश्‍वी ः येथील प्राथमिक शाळा लोकसभागातून डिजिटल करण्यात आली आहे.
वेश्‍वी ः येथील प्राथमिक शाळा लोकसभागातून डिजिटल करण्यात आली आहे.

अलिबाग (बातमीदार) : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढावा, विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी सरकारने लोकसहभागातून शाळा अद्ययावत व चांगल्या करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, वेगवेगळ्या संस्था, संघटना तसेच गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती, माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शाळांना झळाळी देण्याचा प्रयत्न केला. लोकसहभागातून शाळांना मदत करण्याचा लेखाजोखा सरकारने पोर्टलवर मागवला असून, जिल्ह्यातील ३ हजार ५०० शाळांपैकी २२३ शाळांनी पोर्टलवर याची नोंदणी केली आहे. 

शिक्षणाच्या स्पर्धेमध्ये खासगी शाळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा घसरल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्याही हळूहळू घटत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, त्यांच्यामध्ये शाळांची आवड निर्माण व्हावी आणि जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व पालकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून करण्यात आला. त्यासाठी शाळामध्ये माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पालकांना प्राधान्य देण्यात आले आहे. लोकसहभागातून शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. शाळांना झळाळी देऊन डिजिटल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा अनेक माध्यमांतून जिल्हा परिषद शाळांना वेगळे रूप देण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून अद्ययावत करण्यात आल्या. मात्र  लोकसहभागाबाबत सरकारकडे माहिती नसल्याने ही माहिती मिळविण्यासाठी https://ssampsp.org//csr_school  हे पोर्टल सुरू केले आहे. जिल्ह्यातील शाळांना या पोर्टलवर सहभागाचा लेखाजोखा भरण्याचे आवाहन गेल्या आठ दिवसांपासून करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांनी या पोर्टलवर माहिती भरण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत २२३ शाळांनी त्यांची माहिती पोर्टलवर भरली आहे. मात्र, सरकारने माहिती भरण्याची मुदत अद्याप दिली नसल्याने हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यात ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या सतत भेडसावत असल्याने पोर्टलवर माहिती भरताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com