विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 जून 2018

मुंबई - कनिष्ठ महाविद्यालये आणि खासगी क्‍लासेसमध्ये असणाऱ्या "समझोत्या'ला आता चाप बसणार आहे. अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमधील हजेरी सक्‍तीची करण्यात आली असून, त्यासाठी बायोमेट्रिक हजेरीची नोंद करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. जी महाविद्यालये बायोमेट्रिक हजेरीची नोंद करणार नाहीत, त्या महाविद्यालयांची मान्यता काढून घेतली जाणार आहे.

अकरावी, बारावीचे विज्ञान शाखेतील विद्यार्थी महाविद्यालयात न जाता खासगी क्‍लासेसमध्ये मात्र नियमित जातात. यासाठी महाविद्यालयांकडून त्यांना मोकळीक दिली जाते. खासगी क्‍लासेस आणि महाविद्यालयांमध्ये असणाऱ्यांना या साटेलोट्यात शिक्षण विभागाने कोलदांडा घातला आहे. विद्यार्थी महाविद्यालयात नियमित येतात किंवा नाहीत याची पाहणीही शिक्षण निरीक्षकांकडून केली जाणार आहे. बायोमेट्रिक हजेरीचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे. राज्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थसाह्यित कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही बायोमेट्रिक हजेरी सक्‍तीची करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात पाच विभाग
2018-2019 या शैक्षणिक वर्षाकरिता पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद या पाच विभागांतील कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने घ्यावी लागणार आहे. महाविद्यालयांना एका महिन्यात ही व्यवस्था उभारावी लागणार आहे.

Web Title: science department student biometric presenty