नव्या वर्षात सायन्स पार्कची भेट

सुजित गायकवाड
गुरुवार, 3 जानेवारी 2019

नवी मुंबई - वंडर्स पार्क, निसर्ग उद्यान, रॉक गार्डन, सेंट्रल पार्क अशा एकापेक्षा एक सरस प्रकल्पांची निर्मिती केल्यानंतर पालिकेने अद्ययावत ‘सायन्स पार्क’ची नवी मुंबईकरांना नव्या वर्षात भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. नेरूळ येथील सेक्‍टर १९ मधील वंडर्स पार्कच्या उर्वरित आठ एकर जागेत हे साकारण्यात येणार आहे. त्याच्या बांधकामाला वाढीव एफएसआयला मंजुरी देण्याची मागणी पालिकेने सिडकोकडे केली आहे. पार्कमध्ये अंतराळ अवतरल्याची अनुभूती घेता येणार आहे. सौरऊर्जेवरील वेगवेगळे प्रकल्प, विविध रोबो आणि यंत्रे पाहण्याची संधी मिळणार आहे.

मुंबई नेहरू तारांगणच्या धर्तीवर नवी मुंबईत अद्ययावत सायन्स पार्क उभारण्याचा मानस पालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांचा होता. यासाठी रामास्वामी यांनी सिडकोसोबत चर्चा करून वंडर्स पार्कमधील उर्वरित जागेबरोबरच शेजारचा भूखंड पालिकेला मिळावा यासाठी प्रयत्न केला होता; मात्र सिडकोने त्या भूखंडाची निविदेद्वारे विक्री केली. त्यामुळे पालिकेने सिडकोकडे सायन्स पार्कच्या बांधकामासाठी १.५ वाढीव चटई क्षेत्राची मागणी केली आहे. हितेन सेठी या प्रख्यात वास्तुविशारद कंपनीने सायन्स पार्कचा आराखडा तयार केला आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने हा पार्क तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये व्हिंटेज कारचे प्रदर्शन असेल. त्यामध्ये अशा कारबाबत माहिती देण्यात येणार आहे. आधुनिक युग यंत्रमानवाचे असेल, असे म्हटले जाते. त्यामुळे असे यंत्रमानवही पाहण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. पर्यावरणसंदर्भातील तंत्रज्ञानाची माहिती देणारी प्रदर्शने भरवण्यात येणार आहेत. सौरऊर्जेवरील क्षेत्रात आलेल्या नवीन संकल्पनांची माहिती देणारे दालन यामध्ये असेल. पर्यावरणातील विविध ऊर्जा स्त्रोतांपासून मानवाला मिळणारे फायद्यांची माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. 

प्रशासनाने तयार केलेला सायन्स पार्कचा प्रस्ताव कौतुकास्पद आहे; पण प्रशासनाने शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडेही लक्ष द्यावे. पालिकेची रुग्णालये अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. काही ठिकाणी परिचारिका, डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची वानवा आहे. नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देऊन नंतर ज्ञानात भर पाडणारे प्रकल्प हाती घ्यावेत.
- जयवंत सुतार, महापौर

सायन्स पार्कच्या प्रस्तावाचे कौतुक आहे. राष्ट्रवादीने सत्ता असताना रुग्णालये उभारण्याआधीच कर्मचारी, डॉक्‍टरांचा प्रश्‍न का सोडवला नाही? स्वतः काही करायचे नाही आणि आयुक्त प्रामाणिकपणे काम करत असतील तर त्यांना करू द्यायचे नाही, असा अजेंडा सत्ताधारी राबवत आहेत. 
- विजय चौगुले, विरोधी पक्षनेते, पालिका

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन पिढीचे भवितव्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी ‘सायन्स पार्क’ ही शहराची गरज आहे. या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल, ही दक्षता घेण्यात येणार आहे.
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त, पालिका

Web Title: Science Parks gift in the new year