सागरीसेतू परिसर धोक्‍याचा

मंगेश सौंदाळकर
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुंबई - वांद्रे - वरळी सागरीसेतू मुंबईला वेगळी ओळख निर्माण करून देणारा ठरला असला, तरी हा सेतू आणि परिसर मोटारसायकलस्वारांसाठी मृत्यूचा सापळा होत आहे. सेतू परिसरात वर्षेभरात 20 वाहनांना अपघात झाले आहेत. रेल्वे ब्रीज, यु टर्न ब्रीज, सेतू परिसर ही अपघातांची प्रमुख ठिकाण आहेत. या परिसरात स्टंटबाज मोटारसायकलस्वारांना आवर घालताना पोलिसही हैराण झाले आहेत.

मुंबई - वांद्रे - वरळी सागरीसेतू मुंबईला वेगळी ओळख निर्माण करून देणारा ठरला असला, तरी हा सेतू आणि परिसर मोटारसायकलस्वारांसाठी मृत्यूचा सापळा होत आहे. सेतू परिसरात वर्षेभरात 20 वाहनांना अपघात झाले आहेत. रेल्वे ब्रीज, यु टर्न ब्रीज, सेतू परिसर ही अपघातांची प्रमुख ठिकाण आहेत. या परिसरात स्टंटबाज मोटारसायकलस्वारांना आवर घालताना पोलिसही हैराण झाले आहेत.

वांद्य्रातून दक्षिण मुंबईत झटपट जाण्यासाठी हा सागरी सेतू सोईचा ठरला आहे. त्याची विशिष्ट पद्धतीची रचना आणि लांबी देश-विदेशातील पर्यटकांचे लक्ष वेधत आहे. त्याचे हे वेगळेपण मोटारसायकवर स्टंटबाजी करणाऱ्यांच्या नजरेत भरले आहे. स्पोर्टस मोटरसायकलचा सायलेन्सर एखाद्या मोटारसायकलला वापरून अनेक जण त्याद्वारे कर्कश आवाज करत या सेतूवरून निघून जातात. सेतूच्या उद्‌घाटनापासून म्हणजेच, तीन वर्षांपासून मंगळवारी पहाटे, शनिवार आणि रविवारी त्यांची स्टंटबाजीही सुरू असते. त्यांचा हा उपद्रव अन्य प्रवाशांसाठी जीवघेणा ठरतोय. हॉर्न आणि मोटारसायकलच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास स्थानिक रहिवाशांना होतो. त्यामुळे अनेकांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.
वाढत्या तक्रारीनंतर पोलिसांनीही स्टंटबाजीचे प्रकार रोखण्यासाठी धडक कारवाईला सुरुवात केली. वाहतूक पोलिसांनी "रेसिंग विरोधी पथक'च तयार केले होते. वाहतूक आणि स्थानिक पोलिसांच्या कारवाईमुळे काही दिवस स्टंटबाजांनी आपला मार्गही बदलला होता. नियमित नाकाबंदी आणि कारवाईमुळे काही दिवस स्टंटबाजीचे प्रकार थांबले होते; पण ते आता पुन्हा अधिक जोशाने सुरू झालेत.

यु टर्न ब्रीजवर धिंगाणा
पश्‍चिम उपनगरातून येणारे स्टंटबाज मोटारसायकलस्वार वाकोला-बीकेसी मार्गे सागरीसेतूकडे जातात. त्यानंतर ते सुसाट वेगाने पळ काढतात. एकाच वेळी 100-150 मोटारसायकलस्वार सेतू परिसरात येतात. त्यानंतर ते खेरवाडी, वांद्रे येथील रेल्वे ब्रीज, यु टर्न ब्रीज येथे ते स्टंटबाजी करतात. सेतूजवळील यु टर्न ब्रीज हा त्यामुळे प्रचंड धोकादायक झाला आहे. या ठिकाणी मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने अधिक अपघात झाले आहेत. त्याचप्रमाणे यु टर्न ब्रीजच्या खालील बाजूने सुसाट वेगातील स्टंटबाज अचानक ब्रेक मारतात. त्यामुळेही अपघात होतात. या सुसाट मोटारसायकस्वारांवर कारवाई करण्यासाठी विरुद्ध दिशेला पोलिस उभे असतात. पोलिसांना पाहिल्यानंतर स्टंटबाज त्याच ब्रीज खालून पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर जातात. महामार्गावर आल्यावर पोलिसांना चकवा देण्यासाठी माहीममार्गे ते निघून जातात.

चोरीच्या मोटारसायकलचा वापर
स्टंटबाजीच्या तक्रारींनंतर पोलिस परिसरात नाकाबंदी करतात. पोलिसांनी नाकाबंदी केली आहे, हे समजल्यानंतर स्टंटबाज मोटरसायकल त्याच ठिकाणी टाकून पळतात. अनेक स्टंटबाज चोरलेल्या मोटरसायकल वापरत असल्याने त्यांनी टाकून दिलेल्या मोटरसायकली पोलिस जमा करतात. दीड महिन्यापूर्वी एका स्टंटबाजाला खेरवाडी पोलिसांनी अटक केली होती. तो चोरलेल्या मोटरसायकली स्टंटबाजी करता वापरत होता. हे मोटारसायकलस्वार इतके धोकादायक आहेत की, पोलिसांचाच जीव धोक्‍यात येतो. दोन वर्षांपूर्वी खेरवाडी जंक्‍शन येथे स्टंटबाजांनी एका पोलिसाला धडक दिली होती. त्यामध्ये पोलिसाचा मृत्यू झाला होता. सुसाट वेगाचे वेड लागलेल्या स्टंटबाजांना पकडण्याचा प्रयत्न केल्यास अपघाताची भीती असते. स्टंटबाजाचा या पाठलागामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास पोलिसांना डोकेदुखी होते.

शनिवार-रविवारला पसंती
पश्‍चिम उपनगरातील स्टंटबाज हे सोमवारी रात्री उशिरा घरातून बाहेर पडतात. सिद्धिविनायकाचे दर्शन करून ते काही वेळ वाकोला येथे घालवतात. त्यानंतर पहाटेच्या सुमारास वाकोला येथून दादरच्या दिशेने सुसाट जातात. शनिवारी रात्री तर स्टंटबाजांचा अक्षरश: धुमाकूळ असतो. रविवारी पहाटेपर्यंत ते घोळक्‍याने सेतू परिसरात जातात. मुलुंड, गोवंडी, शिवाजीनगर येथील स्टंटबाज कुर्लामार्गे धारावी जंक्‍शन येथे येतात. धारावी जंक्‍शन येथून ते पोलिसांना चकवा देऊन सेतू परिसरात जातात. विशेष म्हणजे, स्टंटबाजीसाठी ते ठराविक मोटरसायकलचा वापर करतात.

पराभव पडते महागात
सागरीसेतू, मरिन ड्राइव्ह, वरळी सी फेस या ठिकाणी स्टंटबाजीचे प्रकार होतात. मरिन ड्राइव्ह परिसरातील स्टंटबाजीसाठी विना गिअरच्या मोटरसायकलीचा वापर करण्यात येतो. हा ट्रेंड आहे. सागरीसेतू आणि वरळी सी फेस येथील स्टंटसाठी स्पोटर्स मोटरसायकलचा वापर होतो. स्टंटबाजी करणारे ठराविक गट आहेत. शनिवार-रविवारी कमी वेळात सागरीसेतूला पोहचणे अशी शर्यत असते. जर एखादा चालक हा उशिरा पोहचला, तर त्याला मोटरसायकल तेथेच सोडून घरी जावे लागते. हा प्रकार सध्या जोर धरू लागला आहे.

कारवाईच्या बडग्यानंतरही...
स्टंटबाजांवर पोलिस कारवाई करतात. त्यांच्या विरोधात जीवघेणी स्टंटबाजी आणि मोटर परिवहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करतात. न्यायालयात आपण पहिल्यादांच स्टंट केला, असे सांगून स्वत:ची सुटका करून घेतात. काही जण तर आपण वेगात नव्हतो, पोलिसांनी उगाचच आपल्यावर कारवाई केली, असा पालकांसमोर कांगावाही करतात. खेरवाडी पोलिसांनी आतापर्यंत 150, वाहतूक पोलिसांनी 120 आणि वांद्रे पोलिसांनी 40 स्टंटबाजांवर कारवाई केली आहे.

अपघाताची मालिक सुरूच..
सागरी सेतू, वांद्रे-कुर्ला संकुल, यु टर्न ब्रीज, रिक्‍लेमेशन, रेल्वे ब्रीज ही धोक्‍याची ठिकाणे आहेत. या ठिकाणी वाहन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. जानेवारीत सेतू परिसरात मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबरमध्ये खेरवाडी जंक्‍शन येथे पोलिसाच्या भीतीने पळून जाणारे तीन स्टंटबाज जखमी झाले होते. ऑक्‍टोबरमध्ये सेतू येथील यु टर्न उड्डाणपुलावर मोटरसायकलस्वाराला अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने मोटरसायकलस्वार पुलावरून थेट खालीच कोसळला होता. डिसेंबरमध्येही सेतू येथे अपघातात एकाचा मृत्यू आणि 2 जखमी झाले आहेत.

Web Title: sea bridge area danger