दर्याचा राजाही करणार सागरी सुरक्षा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

गस्तीची जहाजे भर समुद्रात
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात तटरक्षक दलाचा हवाई तळ बांधून तयार आहे; तसेच नौदलानेही या ठिकाणी तळ उभारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे हवाई तळ आणि नौदलाचा तळ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी जानेवारीमध्ये दिला होता. त्यामुळे नौदल आणि तटरक्षक दलाने गस्ती जहाजे भर समुद्रात दहशतवाद्यांच्या पाळतीवर सोडली आहेत, असे नौदल अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई - दहशतवाद्यांनी दोन वेळा समुद्रमार्गे येऊन मुंबईला लक्ष्य केले होते. त्यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने नौदल आणि तटरक्षक दल दक्ष आहेत; तसेच लवकरच ‘दर्याचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मच्छीमारांना सागरी सुरक्षेबाबत प्रशिक्षित केले जाणार आहे. या विशेष प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला जात आहे. 

देशात सुमारे पाच लाख मच्छीमार नेहमीच सागरी किनाऱ्यावर कार्यरत असतात. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने ते सुरक्षा यंत्रणांचे कान, नाक आणि डोळे ठरू शकतात. समुद्रमार्गे मुंबईसह, रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या किनारी पट्ट्यांवर हल्ल्याची शक्‍यता केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी जानेवारीमध्ये व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिस, फोर्स वन, एटीएस, नौदल, तटरक्षक दल यांना सावध करून किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली. नौदल आणि तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरच्या साह्याने गस्त घालण्यात सुरवात केली होती. 

गुप्तचर यंत्रणेच्या इशाऱ्याची दखल घेत ‘फोर्स वन’नेही तत्काळ गेट-वे ऑफ इंडिया, भाऊचा धक्का, नवी मुंबईतील न्हावा-शेवा बंदरात ‘मॉक ड्रील’ केले होते. तसेच शोधमोहीम हाती घेतली होती. ‘मॉक ड्रील’मध्ये प्रत्यक्षात समुद्रमार्गे येणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचा आदेश देण्यात आल्याने त्या धर्तीवर ही तयारी सुरू आहे. 

नौदलाने सागरी पोलिसांच्या साह्याने ‘सागर सुरक्षा कवच’ मोहीम राबवण्यास सुरवात केली होती. त्याचाच भाग म्हणून माहिती मिळवण्याच्या दृष्टीने मच्छीमारांसाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. याशिवाय कोळीवाडे, समुद्रकिनाऱ्यांवरील गावठाणे येथील नागरिकांशी अधिकाधिक संपर्क वाढवण्यास नौदल व तटरक्षक दलाला सांगण्यात आले आहे. त्याअंतर्गत मच्छीमारांचे गट बनवून त्यांना विशेष माहिती मिळवण्यासह सुरक्षेच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, काही साधनांचाही पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

देशाचे सुजाण नागरिक म्हणून आम्ही नेहमीच सुरक्षा यंत्रणांना सहकार्य केले आहे; पण अशा कार्यक्रमांसह कोळी समाजातील मुलांनाच सागरी पोलिस, नौदल आणि तटरक्षक दलात नोकरीसाठी प्राधान्य द्यायला हवे. या मुलांना समुद्राची माहिती असल्याने त्याचा फायदा सुरक्षेसाठी होऊ शकतो.
- विजय वरळीकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन

Web Title: Sea Security Fisher Terrorist Navy and Coast Guard