विराट कोहलीच्या एजंटचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

ठाणे - मिरा रोड येथील बनावट कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ठक्कर याने भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याच्याकडून ऑडी कार खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे.

ठाणे - मिरा रोड येथील बनावट कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ठक्कर याने भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याच्याकडून ऑडी कार खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे.

कोहलीचा यात थेट संबंध नसल्याने पोलिसांनी ती गाडी विकण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या एजंटचा शोध सुरू केला आहे. ठाणे पोलिसांनी ही कार हरियाणा येथून जप्त केली. अमेरिकी नागरिकांना गंडा घालून मिळालेल्या रकमेतून सागरने ही कार खरेदी केल्याचा संशय आहे. एजंटच्या माध्यमातून हा व्यवहार झाला असल्याने विराट कोहलीचा थेट संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सागर हा एखाद्या गैरव्यवहाराशी संबंधित आरोपी असावा, याची त्या एजंटलाही कल्पना नसावी, अशी शक्‍यताही पोलिसांनी वर्तविली.

अमेरिकी नागरिकांची उत्पन्न कराच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या मिरा रोड येथील बनावट कॉल सेंटर पोलिसांनी उघडकीस आणले. या कॉल सेंटरमधून सुमारे 30 कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. अमेरिकेत याप्रकरणी "एफबीआय'ने तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सागर फरारी आहे. तपासात भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली याच्याकडून सागरने ऑडी कार खरेदी केल्याचे पुढे आले आहे. कॉल सेंटरप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने ही कार हरियाणा राज्यातील रोहतकमधील एका मित्राकडे लपवून ठेवली होती. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ती जप्त केली. कॉल सेंटरप्रकरणी अमेरिकी तपास यंत्रणेने 20 जणांना अटक केली आहे; तसेच अहमदाबादमधील पाच कॉल सेंटरही अमेरिकी तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. त्यामुळे अमेरिकेने दाखल केलेल्या गुन्ह्याचा मिरारोड प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची माहिती घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Search of Virat Kohlis agent