सी-वूडस्‌मध्ये वीज गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

आधीच ऑक्‍टोबर हिट आणि त्यात दोन दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव यामुळे सी-वूडसमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचे नमूद करत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी, लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले. 

नवी मुंबई : आधीच ऑक्‍टोबर हिट आणि त्यात दोन दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव यामुळे सी-वूडसमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचे नमूद करत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी, लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले. 

मंगळवारपासून (ता.१५) सी-वूडसमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. सकाळी ११ च्या सुमारास; तर संध्याकाळी सात ते रात्री बारा-साडेबारापर्यंत विजेचा हा लपंडाव बुधवारीही सुरू होता. वातावरणात उकाडा वाढला असतानाच विजेच्या या समस्येमुळे नागरिक हैराण झाले होते. दरम्यान, नेरूळ सेक्‍टर- ६ मधील नागरिकांनाही या समस्येला सामोरे जावे लागले. याबाबत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी एस. पी. गायकवाड यांनी, सर्किटमध्ये बिघाड होत असल्याने नेरूळमध्ये विजेची समस्या उद्‌भवत असल्याचे सांगितले. 

विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू असल्याने त्यांच्याही अभ्यासात व्यत्यय येत आहे. दिवाळी तोंडावर आली असल्याने घरा-घरात फराळ बनवण्याचे काम सुरू आहे. त्यातच ऐनवेळी वीज दगा देत असल्याने गृहिणीदेखील वैतागल्या आहेत. सकाळच्या सुमारास वीज येण्या-जाण्याचा खेळ सुरू असल्याने, विजेचा दाब वाढून उपकरणांना हानी पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एरवी सुरळीत असलेला वीजप्रवाह ऐन सणासुदीच्या वेळेतच कसा खंडित होतो, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. 

सी-वूडसमधील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्यामागचे नेमके कारण समोर येत नव्हते. दोन दिवस हा तांत्रिक बिघाड शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. सिटी (करंट ट्रान्स्फॉर्मर) मध्ये समस्या निर्माण झाली होती. ती पटकन लक्षात येत नाही. सध्या दुसऱ्या फिडरवरून लोड सुरू करण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल. 
- एस. पी. गायकवाड, वरिष्ठ अधिकारी, महावितरण.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the seawoods Lightning concealment