सेकंड हॅण्‍ड वाहनविक्री डबघाईला

महाड : विक्रीसाठी उभ्या असलेल्‍या सेकंड हॅण्‍ड वाहने
महाड : विक्रीसाठी उभ्या असलेल्‍या सेकंड हॅण्‍ड वाहने

महाड (बातमीदार) : मंदीच्या कचाट्यात दक्षिण रायगडमधील सेकंड हॅण्‍ड वाहनविक्री व्यवसाय सापडला आहे. या परिस्थितीत बदल झाला नाही, तर वर्षभरात हा व्यवसाय या भागातून हद्दपार होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

दक्षिण रायगडमधील महाड, पोलादपूर, श्रीवर्धन आदी तालुक्‍यात सेकंड हॅण्‍ड वाहन खरेदी- विक्रीचा व्यवसाय फॉर्मात होता. परंतु आता या व्यवसायालाही मंदीच्या झळा पोहोचल्या आहेत. महाड परिसरात सेकंड हॅण्‍ड वाहन खरेदी- विक्रीचा व्यवसाय करणारे तीन-चार व्यावसायिक आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे आठवड्याला किमान एक तरी सेकंड हॅण्‍ड वाहनांची विक्री होत असे. यामध्ये कारचे प्रमाण अधिक आहे. परंतु या वर्षी या व्यवसायालाही फटका बसला. एप्रिलपासून कारची विक्री घटली. सद्यस्थितीमध्ये महिन्याला एखाद-दुसऱ्या कारच्या विक्रीचा व्यवहार होत आहे. 

या व्यवसायातील व्यक्ती कारमालकाकडून वाहने विकत घेतात. त्यावर देखभाल दुरुस्तीसाठी थोडाफार खर्च करून त्या पुन्हा विक्रीसाठी ठेवतात; तर दुसऱ्या पर्यायांमध्ये कारमालक विक्रेत्यांच्या दुकानात आपले वाहन उभे करतो. ते विकून विक्रेत्याला त्यातील हिस्सा देतो; परंतु व्यवसायात नाव व्हावे या दृष्टीने पहिला पर्याय विक्रेते अधिक निवडत असतात. त्यामुळे सेकंड हॅण्‍ड गाड्या विकल्या न गेल्यास विक्रेत्याने त्या गाड्यांवर केलेला खर्च वाया जाण्याची शक्‍यताही असते. त्यामुळे या व्यवसायातील विक्रेते अधिक चिंतेत पडले आहेत. 

जुन्या वाहनांबाबत नियम व धोरण सतत बदलत असल्याने त्याचा परिणामही विक्रिवर दिसतो. दसरा, दिवाळी, अक्षय्य तृतीया अशा सणांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘सेकंड हॅण्‍ड’ कारची विक्री होत असे. दीड लाख रुपयांच्या पुढे सेकंड हॅण्‍ड कार उपलब्ध होत असल्या तरीही हवा तो रंग व मॉडेल मिळेल याची शाश्वती यामध्ये नसल्याने याचा काही अंशी फटका या व्यवसायाला बसत आहे.

आठवड्याला एक-दोन कार सहज विकल्या जात होत्या. परंतु आता महिन्यातून एखाद्या कारची विक्रीही होते. यामुळे ना नफा ना तोटा यावर विक्रेत्यांना व्यवसाय करावा लागत आहे. 
- इम्रान सय्यद, वाहनविक्रेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com