४० पोती धान्याचे रहस्य गुलदस्त्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

रास्त धान्य दुकानातील धान्य खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून वडखळ पोलिसांनी ४० पोती धान्य जप्त केले आहे.

पेण (वार्ताहर) : रास्त धान्य दुकानातील धान्य खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून वडखळ पोलिसांनी ४० पोती धान्य जप्त केले आहे. मात्र, याबाबत अहवाल महसूल विभागाकडून दोन दिवसांनंतरही मिळाला नसल्याने वडखळ पोलिसांच्या कारवाईला "ब्रेक' बसला आहे. 

पेण तालुक्‍यातील कोंडवी गावातील रेशन दुकानावरील धान्य खुल्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याची माहिती वडखळ पोलिसांना सोमवारी दुपारी मिळाली. त्या आधारे सहायक निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने कोंडवी गावातून नोगोठणेकडे जाणारा संशयित टेम्पो निगडे गावाजवळ पकडला. यामध्ये ३० गोणी तांदूळ व १० गोणी गहू सापडला. टेम्पोचालक बबन कदम याच्या माहितीमध्ये तफावत असल्याने वडखळ पोलिसांनी टेम्पोचालकाला टेम्पोसह वडखळ पोलिस ठाण्यात आणले. तांदूळ व गहू हे रेशन दुकानात विक्रीसाठी असलेले आहेत का? या बाबतचा अहवाल वडखळ पोलिसांनी पेण तहसीलदार कार्यालयाकडे मागितला. याबाबत प्रभारी पुरवठा अधिकरी तथा नायब तहसीलदार शशिकांत वाघमारे यांनी सोमवारी सायंकाळी कोंडवी गावातील रेशन दुकानदाराची चौकशी करून अहवाल देण्यात येईल असे सांगितले. मात्र, बुधवारी सायंकाळपर्यंत पोलिसांना महसूल खात्याचा अहवाल प्राप्त न झाल्याने कारवाईसाठी थांबावे लागले आहे. 

वडखळ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या धान्याबाबत पेण तहसीलदार, पुरवठा अधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाला नाही. तो आल्यावर कारवाईची पुढील दिशा ठरेल. 
- अजित शिंदे, सहायक निरीक्षक, वडखळ 

सरकारी बैठकीसाठी अलिबाग येथे आहे. धान्याबाबत अहवाल पेण तहसीलदार यांच्याकडे सादर केला आहे. तहसीलदार यांची सही झाल्यानंतर तो पोलिसांना देण्यात येणार आहे. 
- शशिकांत वाघमारे, नायब तहसीलदार, पेण 

पेण तालुक्‍यात रास्त दुकानांत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. शासकीय अधिकारी या भ्रष्टाचारात सहभागी आहेत. गरीब, आदिवासी कुटुंबाच्या नावे आलेले धान्य दुकानदार परस्पर विक्री करतात. त्यामुळेच अहवाल देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. 
- हरीश बेकावडे , सामाजिक कार्यकर्ते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Secret of 40 grains bags