नवी मुंबईकरांची सुरक्षा धोक्यात

नवी मुंबईकरांची सुरक्षा धोक्यात

नवी मुंबई - भिंती कोसळणे, दरड कोसळणे, इमारत दुर्घटना आणि पूरपरिस्थितींसारख्या अस्मानी संकटांशी दोन हात करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या स्वतंत्र पथकाचा महापालिकेत अभाव आहे. शहरात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे विभाग कार्यालय अथवा अग्निशमन दलाच्या जवानांचाच वापर केला जातो. नवी मुंबईसारख्या मोठ्या शहरात आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतंत्र पथक नसल्यामुळे शहरावर एखादे संकट ओढावल्यास बचाव कार्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी मुंबईसह राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत एक जुनी भिंत कोसळून काही लोकांचा जीव गेला. कोकणात तिवरे धरण फुटून वाड्याच्या वाड्या वाहून गेल्या. यासारखी अनेक घटना पावसामुळे घडल्या. या सर्व घटनांमध्ये (एनडीआरएफ) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी बचावकार्य केले. मुंबईत एखादी घटना घडल्यास त्याठिकाणी बचावकार्य करण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापनाचे एक पथक तैनात असते; मात्र १४ लाख लोकसंख्या असलेल्या नवी मुंबई शहरात एखादी आपत्ती ओढावली तर बचावकार्य करण्यासाठी महापालिकेला अग्निशमन दलाचे जवान अथवा विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी यूएनडीपी (संयुक्त राष्ट्रे) मार्फत शहराचा आपत्ती धोका निवारण आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता; मात्र तो प्रस्तावही सत्ताधाऱ्यांनी फेटाळल्यामुळे सरकारचा आपत्ती धोका निवारण आराखडा तयार करण्याचे काम रखडणार आहे.

नोडनिहाय पथक
२६ जुलै २००५ ला आलेल्या पुरानंतर राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक विभाग कार्यालयनिहाय आपत्ती व्यवस्थापनाचे दहा सदस्यसंख्येचे प्रत्येकी एक पथक तयार करण्यात आले. यात सामाजिक कार्यकर्ते, मच्छीमार, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले सदस्य, महापालिका कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी असे मिळून हे पथक तयार करण्यात आले. 

राज्यात कोणत्याच महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे स्वतंत्र पथक नाही. शहरात घडणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये बचावकार्यासाठी एनडीआरएफचेच पथक बोलवले जाते; मात्र एनडीआरएफच्या तज्ज्ञांकडून आपल्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम आपण केले आहे.
- डॉ.  एन. रामास्वामी, आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com