"चायनिज गाड्यां'मुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर 

"चायनिज गाड्यां'मुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर 

ऐरोली - राहण्यासाठी चांगले शहर म्हणून लौकिक असणाऱ्या नवी मुंबईत अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी लाल रंगाच्या बेकायदा चायनिज गाड्या दिसू लागल्या आहेत. त्या ठिकाणी रात्रभर मद्यपींच्या पार्ट्या झडत असल्याने उशिरा कामावरून घरी येणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याकडे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रारीही करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. 

वाशी विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर सेक्‍टर 10 येथील हिमबिंदू सोसायटीच्या बाजूला एक मोकळा भूखंड आहे. त्यावर गेली अनेक वर्षे बेकायदा नर्सरी, बांधकाम साहित्य विक्री केंद्र आणि खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या होत्या. याबाबत नागरिकांनी माहिती घेण्यास सुरुवात केल्याने अधिकाऱ्यांनी कारवाई केली; मात्र नेरूळ रेल्वेस्थानक, घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली येथील रेल्वेस्थानकांच्या शेजारी रात्रीच्या वेळी चायनीज पदार्थ विक्रीच्या गाड्या लागतात. त्यांच्या आडोशाला मद्यापीच्या पार्ट्या बिनबोभाटपणे सुरू असतात. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या वाईन शॉपमधून दारू विकत घेऊन मद्यपी या मोकळ्या भूखंडावर मैफल जमवतात. कधीकधी त्यांच्या चर्चा एवढ्या टोकाला जातात की भांडणेही होतात. याचा पदपथांवरून ये-जा करणाऱ्यांना त्रास होत आहे. या ठिकाणी असलेल्या एनएमएमटीच्या बस थांब्यांवरील प्रवासीही या रोजच्या त्रासाला कंटाळले आहेत. बसची वाट पाहत बसलेल्या एकट्यादुकट्या महिलांनाही या मद्यपींचा नाहक त्रास सहन करावा लागतो. 

मद्यपींच्या आरडाओरडीचा शेजारी राहणाऱ्या नागरिकांनाही त्रास सोसावा लागत आहे. या ठिकाणी उघड्यावर एलपीजी गॅस सिलेंडरवर अन्न शिजवले जाते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. 

वाशी सेक्‍टर 12 मधील पदपथ या फेरीवाल्यांनी व्यापलेला आहे. याबाबत नवी मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस किशोर पाटील यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र, पालिकेतर्फे बेकायदा फेरीवाले व चायनीज खाद्यपदार्थांचे विक्रेते यांच्यावर नियमित कारवाई सुरू असल्याचे वाशीचे विभाग अधिकारी दिवाकर समेळ यांनी सांगितले. परंतु, तरीदेखील संध्याकाळ झाल्यानंतर वाशी शहरातील या परिस्थितीप्रमाणे सीबीडी-बेलापूर, नेरूळ, घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली आणि रबाळे येथे असेच दृश्‍य नजरेस पडते. तक्रार केल्यानंतरही पोलिसांकडून दखल न घेतल्यामुळे पोलिसांचे आणि फेरीवाल्यांचे अर्थपूर्ण संबंध आहेत की काय अशी शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहे. 

शहरातील रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या चायनीज पदार्थांच्या गाड्या आणि त्यांच्या आडोशाने चालणारे मद्यपान, यामुळे अशा ठिकाणाहून जाताना महिलांना खूपच असुरक्षित वाटते. पोलिस कधीतरी तात्पुरती कारवाई करतात. मात्र हे प्रकार काही थांबत नाहीत. 
- ऍड्‌. अनिता शिंदे, सणस, कोपरखैरणे. 

चायनीज गाड्यांसंदर्भात नियमित कारवाई सुरू आहे. या पुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. 
- सुधाकर पाठारे, पोलिस उपायुक्त, नवी मुंबई. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com