संरक्षण, नौदलाच्या औषधांची खुलेआम विक्री!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

मुंबई - संरक्षण विभागाला पुरवठा होणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या आठवड्यापासून या संदर्भात कारवाई सुरू केली. मुंबई आणि नवी मुंबईतील औषधविक्रेत्यांच्या दुकानांवर छापे घालून लाखोंचा साठा जप्त केला. यात औषधांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या एका बड्या कंपनीचाही समावेश आहे.  

मुंबई - संरक्षण विभागाला पुरवठा होणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या आठवड्यापासून या संदर्भात कारवाई सुरू केली. मुंबई आणि नवी मुंबईतील औषधविक्रेत्यांच्या दुकानांवर छापे घालून लाखोंचा साठा जप्त केला. यात औषधांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या एका बड्या कंपनीचाही समावेश आहे.  

सरकारला थेट पुरवल्या जाणाऱ्या औषधांची विक्री खुल्या बाजारात करता येत नाही. हा औषधांचा साठा संबंधित विभागाच्या शिक्‍क्‍याने वितरित केला जातो. सैन्य दलाला पुरवलेली औषधे मुंबईत विक्रीसाठी आल्याची माहिती गेल्या आठवड्यात ‘एफडीए’च्या ‘इंटेलिजन्स ब्युरो’च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांनी गेल्या बुधवारी भायखळ्यातील संकल्प सिद्धी टॉवरमधील निवान फार्माक्‍युटिकल्स या वितरकावर छापा घातला. तिथे संरक्षण व नौदलासाठी दिले जाणारे ‘सीटाग्लिप्टिन फॉस्फेट’ गोळ्या आणि ‘विण्डाग्लिप्टीन’ गोळ्या सापडल्या. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी त्या जप्त केल्या.

या गोळ्यांच्या पाकिटांवर ‘ही औषधे संरक्षण व नौदलासाठी असून, विक्रीसाठी उपलब्ध नाहीत’, असे लिहिलेले होते; मात्र संबंधित वितरकाने व्हाईटनरच्या मदतीने ते खोडल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. जप्त केलेली औषधे सुमारे १८ लाखांची आहेत. निवान फार्माक्‍युटिकल्सकडून ही औषधे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातही विकल्या गेल्याचे समजते. 

भायखळ्यातील कारवाईनंतर मुलुंडमधील सेफलाईफ इंटरप्राईजेस, सानपाड्यातील श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर्स आणि तळोजा, नवी मुंबईतील ऑनलाईन औषधविक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या फार्मसी कंपनीच्या गोदामावर एफडीएने छापे घातले. येथेही संरक्षण व नौदलाचे शिक्का असलेल्या औषधांचा साठा सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘ऑल फूड ॲण्ड ड्रग्ज लायसेन्स फाऊंडेशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी हा गैरप्रकार उजेडात आणला. संपूर्ण छाप्यात आतापर्यंत ३० लाखांचा साठा जप्त करण्यात आल्याचा दावा पांडे यांनी केला आहे.

पाच जण ताब्यात
याप्रकरणी सोमवारीही एफडीएच्या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी छापे घातले असून, आतापर्यंत पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते; मात्र अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

संरक्षण, नौदलाच्या औषधांप्रकरणी ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. याबाबत आताच काही माहिती देता येणार नाही. 
- डी. आर. गहाणे, सहआयुक्त, औषध विभाग, एफडीए

Web Title: Security Navy Medicine Open Sailing