मुंबईसाठी भाजप-शिवसेनेची स्वबळाची शिकस्त!

मुंबईसाठी भाजन-शिवसेनेची स्वबळाची शिकस्त!
मुंबईसाठी भाजन-शिवसेनेची स्वबळाची शिकस्त!

दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "हिंमत असेल तर युती तोडा' असे आव्हान भारतीय जनता पक्षाला दिले होते. शिवसेनेच्या आक्रमकपणाकडे भाजप नेतृत्वाने तसे दुर्लक्षच केले. परंतु, नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर होताच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर आला आहे. शिवसेनेच्या रणनितीमुळे एकप्रकारे भाजपचीच कोंडी झाल्याचे दिसते. कारण भाजपचे नेते आता युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या, फायदा असेल तर युती करा असे म्हणू लागले आहेत. अद्याप महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा स्थानिक नेतृत्वाने केली आहे. त्यामुळे मुंबईसह इतर महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये तसेच विधानपरिषद निवडणुकीत दोन्ही पक्ष आमने सामने येण्याची शक्‍यता आहे.

राज्यातील सत्तेत भाजपबरोबर शिवसेना सहभागी असली तरी दोन्ही पक्षाचे तसे फारसे सख्य नाही. त्यामुळेच दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही असेच गेल्या दोन वर्षांत दिसून आले आहे. विशेषतः भाजपच्या मुंबईतील नेत्यांनी शिवसेनेच्या मर्मावर कायमच बोट ठेवले. त्यातच या नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरुन शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरवात केली. मुंबई महापालिका स्वबळावर ताब्यात घेण्याची तयारी पक्षाने सुरू केली होती. त्यांचे नेते करीत असलेल्या टिपण्णीमुळे दोन्ही पक्षात सातत्याने तणाव निर्माण होत होता. खासदार किरीट सोमय्या यांनी तर शिवसेनेच्या कारभारास माफियाराज म्हटले. (विशेष म्हणजे गेली पंधरा वर्षे तेही महापालिकेच्या सत्तेत आहेत.) मुंबई भाजपचे पक्षाध्यक्ष आशिष शेलार तर शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. कोपर्डी घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण बदलत गेले. गेली दोन वर्षे राजकीयदृष्ट्या जोषात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेवरून विरोधकांनी घेरले. ही घटना हाताळण्यात सरकार किंबहुना गृहखाते कमी पडले. त्यामुळे या घटनेचे तीव्र पडसाद मराठा मोर्चाच्या रूपाने उमटले. त्यामुळे राजकीय वातावरणच बदलून गेले. त्याचे पडसाद आगामी निवडणुकांमध्ये उमटण्याची चिन्हे नाकारता येत नाही.

फडणवीस सरकारला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकांत एकप्रकारे राज्य सरकारच्या दोन वर्षातील कारभाराचे प्रतिबिंब उमटण्याची शक्‍यता आहे. निवडणुकांचे निमित्त साधून भाजपने आपली ताकद वाढविण्यास सुरवात केली आहे. इतर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मुक्तपणे प्रवेश देण्याचे पक्षाचे धोरण आहे. यामागे कुठल्याही स्थितीत मोठ्या महापालिका ताब्यात घेणे हाच हेतू आहे. यात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांनाही प्रवेश देण्यात आल्याने भाजपची प्रतिमा डागाळत चालली आहे. कारण या आधी तेच या मुद्यावरुन ान उठवीत होते. त्यातच शिवसेनेचा दसरा मेळावाही जोरात झाला. व्यंगचित्रामुळे निर्माण झालेल्या वादामुळे मेळाव्यातील गर्दीकडे सगळ्यांचेच लक्ष होते. परंतु, नेहमीप्रमाणे गर्दी झाली. त्यानंतर लगेचच नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. शिवसेना नेतृत्वाने याबाबत त्यांच्या लोकप्रतिनिधींचा कानोसा घेतला असता स्वबळाला सर्वांनीच होकार दिला. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या घोषणेचे पडसाद पुण्यातही उमटले. स्थानिक नेत्यांनी महापालिका युती न करता लढविण्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपचे पक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती बाबत सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही युतीबाबत सकारत्मक भूमिका घेतली आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी शिवसेनेला डिवचणारे आता युतीबाबत सकारात्मक कसे झाले हा देखील प्रश्‍न आहे. खरेतर सध्या जे राजकीय वातावरण आहे ते एकंदरीत भाजपला फारसे अनुकुल नाही. तसेच मोदी लाट आता ओसरत चालली आहे. राज्य सरकारने काही चांगले निर्णय घेतले असले तरी ते लोकांपर्यंत पोचविण्यात भाजप नेते कमी पडले आहेत. त्यामुळे सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असूनही कुठे फारसा उत्साह दिसून येत नाही. एकंदरीत स्वबळावर लढून निवडणुका जिंकण्यासारखी स्थिती सध्या तरी नाही. त्यामुळेच युती केलेली बरी असे भाजप नेतृत्वाला वाटत असावे.

अर्थात शिवसेना नेतृत्वाने नगरपालिका निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा केली असली तरी मुंबई, ठाण्यासह इतर महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीबाबत भाष्य केलेले नाही. पुणे महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा स्थानिक नेत्यांनी केली आहे. त्यांचे पुण्यातील भाजप नेत्यांशी असलेले सख्य पाहता पुण्यात दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतील असेच सध्याचे वातावरण आहे. इतरही ठिकाणी तिच स्थिती असू शकले. त्यामुळे दोन्ही पक्षात त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेप्रमाणेच आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळण्याची शक्‍यता आहे. मुंबई व ठाण्यात त्याची तीव्रता अधिक असण्याची चिन्हे आहेत. कारण दोन्ही महापालिका शिवसेनेची शक्तिस्थाने आहेत. ती ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेनेची शिकस्त सुरू आहे. तर त्यावर आपली सत्ता आणावी यासाठी भाजप नेतृत्व प्रयत्नशील आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार राजकीय फटाके फुटण्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com