आशिष शेलार कोणाला म्हणाले, हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?

पूजा विचारे
Thursday, 13 August 2020

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर टीका करत राज्यातल्या मंत्र्यांना भांडखोर सासूची उपमा दिली आहे.

मुंबईः गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी कोकणात जाण्यासाठी राज्य सरकारनं एसटी बसची सुविधा उपलब्ध करुन दिली. मात्र या काळात रेल्वे न सोडल्यानं भाजप आमदारानं ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर टीका करत राज्यातल्या मंत्र्यांना भांडखोर सासूची उपमा दिली आहे. शेलार यांनी सरकारवर टीका करण्याची ही पहिली वेळ नाही. शेलार यांनी यापूर्वीही ई-पासच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला होता.

आशिष शेलार यांनी ट्विट करून राज्य सरकारमधील समन्वयाच्या अभावावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की,  कुठलाही ठोस निर्णय नाही, कसले नियोजन, समन्वय नाही, केवळ दुसऱ्याला दोष देऊन स्वतःचे अपयश झाकण्याचे कौशल या राज्यातील "पाडून दाखवा सरकारकडे"आहे. कोकणात रेल्वे गाड्या सोडण्यावरुन हेच सुरु आहे. रेल्वेची तयारी असतानाही गाड्या राज्य सरकारने सोडल्या नाहीत. चाकरमान्यांना त्रास दिला.

आणखी एक ट्विट करत त्यांनी म्हटलं की, आम्ही वारंवार सांगितले, रेल्वे तयार आहे पण ऐकले नाही.. एसटी वेळेत दिली नाही. अवाजवी भाडे देऊन चाकरमान्यांना जावे लागले.. आता परतीच्या प्रवासाला तरी रेल्वे उपलब्ध करुन द्यायची सोडून मंत्री तू-तू -मै-मै करीत बसलेत. "पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई?, असा संतप्त सवालही शेलार यांनी उपस्थित केला आहे. 

आजपासून कोकणात जाण्यासाठी असे असतील नियम

  • १३ ऑगस्ट म्हणजेच आजपासून आणि त्यानंतर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना ४८ तास अगोदर कोविड-१९ ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करून घ्यावी लागेल.
  • या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असला तरच कोकणात जाता येईल. जिल्ह्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तीला तीन दिवस होम क्वारंटाइन रहावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनानं तसंच यापूर्वीच जाहीर केलं आहे. 
  • एसटी बसनं कोकणात येण्यासाठी ई-पासची गरज लागणार नसून मात्र इतर खासगी गाड्यांनी येणाऱ्यांना ई-पास बंधनकारक असेल.
  • मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकांवरून १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान एसटी बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
  • Senior BJP leader Ashish Shelar criticised Thackeray government not running trains Konkan Ganesh Festival


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior BJP leader Ashish Shelar criticised Thackeray government not running trains Konkan Ganesh Festival