एनएमएमटी बसमधून पडल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

एनएमएमटी बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्‍टरने त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सीबीडी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. 

नवी मुंबई : धावत्या एनएमएमटी बसमधून पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सीबीडी परिसरात घडली. भरथन शेखरन (68) असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ते सीबीडीतून खारघर येथे परतत असताना हा अपघात घडला. 

या घटनेतील मृत भरथन शेखरन हे खारघर सेक्‍टर-7 मध्ये कुटुंबासह राहतात. शेखरन हे सेंट्रल एक्‍साईज विभागातून सुप्रीटेंडट म्हणून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ते अनेक खासगी छोट्या कंपन्यांचे ऑडिटिंगचे काम करत होते. गुरुवारी याच कामानिमित्त सीबीडी परिसरात ते आले होते. त्यानंतर सायंकाळी सीबीडीतून उरण कळंबोली या एनएमएमटी बसने ते खारघर येथे परतत होते. बस सीबीडीतील रायगड भवन येथील वळणावरून जात असताना, ते बसच्या पाठीमागील दरवाजातून खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली.

एनएमएमटी बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्‍टरने त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. सीबीडी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. 

Web Title: Senior citizen dies due to falling from NMMT bus