ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे निधन 

ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे निधन 


 
मुंबई : "अग्रलेखांचे बादशहा' अशी ख्याती असलेले ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे (वय 85) अल्पशा आजाराने शुक्रवारी (ता. 22) पहाटे लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी मरिन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

गिरगावमधील खाडिलकर मार्गावरील दैनिक "नवाकाळ'च्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी 12 ते 2 दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेण्यात आले होते. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. 
नीळकंठ खाडिलकर यांचा जन्म 6 एप्रिल 1934 रोजी झाला होता. ते दैनिक "नवाकाळ'चे 27 वर्षे संपादक होते. या काळातील महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी अग्रलेखांमधून भाष्य केले. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि "केसरी'चे माजी संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. खाडिलकर उत्तम मुलाखतकार होते, त्यांनी घेतलेल्या अनेक मुलाखती गाजल्या होत्या. 

खाडिलकर यांनी तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनाद्वारे वाचकांचे प्रबोधन केले आणि सामाजिक-राजकीय परिस्थितीचे विवेकी विवेचन केले. गिरणी कामगारांच्या प्रश्‍नांना त्यांनी "नवाकाळ'मधून वाचा फोडून सरकारदरबारी पाठपुरावा केला. त्यांच्या "हिंदुत्व' या पुस्तकाला वाचक-समीक्षकांनी पसंती दिली. 

अनेक पुरस्कारांनी सन्मान 
नीळकंठ खाडिलकर यांना 2008 मध्ये महाराष्ट्र सरकारने पत्रकारितेसाठी पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यानंतर त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री किताब प्रदान करण्यात आला. "सुधारक'कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार आणि लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. त्यांनी दोन वेळा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद भूषवले. 
 

लढवय्ये पत्रकार 
"अग्रलेखांचे बादशहा' हा किताब सार्थ करणारे नीळकंठ खाडिलकर लढवय्ये पत्रकार होते. थोर परंपरा लाभलेल्या "नवाकाळ' वृत्तपत्राला त्यांनी श्रमिक, कष्टकरी व जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ बनवले. कामगारांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना त्यांनी वाचा फोडली; तसेच अनेक प्रश्‍नांचा सरकारदरबारी पाठपुरावा केला. देशाशी व राज्याशी निगडीत विविध विषयांवर वाचकांचे प्रबोधन करताना त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रप्रेम व संस्कृतीप्रेमाची भावना जागवली. खाडिलकर यांचे महान कार्य पत्रकार व समाजसेवकांना नेहमी प्रेरणा देत राहील. त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो व त्यांच्या सर्व आप्तस्वकीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो. 
- राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी  

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com