संवेदनशील मतदान केंद्रे "ड्रोन'च्या नजरेत 

मंगेश सौंदाळकर - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीकरिता मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. शहरातील सुमारे 12 संवेदनशील विभागातील मतदान केंद्रांवर सीसी टीव्ही कॅमेऱ्यासह आता "ड्रोन'ची नजर राहणार आहे. मुंबई पोलिस निवडणुकीसाठी पहिल्यांदाच "ड्रोन'चा वापर करणार आहेत. मुंबईत गावठी दारू विक्रीवरही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. उत्तर प्रादेशिक विभागात आतापर्यंत दारूप्रकरणी चार गुन्हे दाखल झाले.

पालिका निवडणुकीत मुंबईतील काही प्रभागांची रचना बदली आहे. शहरात अनुचित घटना घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली आहे. निवडणुकीदरम्यान कशा प्रकारे काम करावे याकरिता पोलिसांनी कृती आराखडा तयार करून 25 सूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. जानेवारीपासून पोलिस त्यावर काम करत आहेत. प्रचारावेळी कोणत्या विभागात पूर्ववैमन्यस्यातून वाद होऊ शकतात हे लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी अशा विभागांवर मुंबई पोलिसांनी अधिक भर दिला आहे. 
मागील निवडणुकीवेळी झालेल्या घटनांचा आढावा घेत मुंबई पोलिसांनी यंदा शहरातील सुमारे 12 संवेदनशील विभागावर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक काळात परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्याचा वापर पोलिस करणार आहेत. मात्र काही गल्लीबोळात सीसी टीव्ही कॅमेरे नाहीत. खासकरून उपनगरातील झोपडपट्ट्या, डोंगराळ भागामधील मतदान केंद्रांवर पोलिस "ड्रोन'च्या मदतीने लक्ष ठेवणार आहेत. "ड्रोन'सह पोलिसांना हॅंडीकॅम कॅमेरेही देण्यात येणार आहेत. 

नोटाबंदीनंतर शहरातील सट्टेबाज भूमिगत झाले आहेत. निवडणुकीत सट्टेबाजीचे प्रकार होऊ नयेत, याकरिता गुन्हे शाखेचे पोलिस खास नजर ठेवणार आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी दारूवाटपाचे प्रकार होऊ नयेत यासाठी धडक कारवाईही सुरू केली आहे. झोपडपट्ट्यांतील गावठी दारूच्या अड्ड्यांवर कारवाईकरिता स्वत: वरिष्ठ निरीक्षक कारवाई करत आहेत. आतापर्यंत उत्तर प्रादेशिक विभागात पोलिसांनी या प्रकरणी चार गुन्हे दाखल केले. 

महापालिका निवडणुकीकरिता मुंबई पोलिस सज्ज आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. काही संवेशनशील भागांत सीसी टीव्ही आणि "ड्रोन'चा वापर केला जाईल. 
- दत्ता पडसलगीकर, आयुक्त, मुंबई पोलिस

Web Title: Sensitive polling stations under drone