केडीएमटी डबघाईच्या टीकेची गंभीर दखल ; जबाबदार अधिकाऱ्यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

केडीएमटी सध्या आर्थिक संकटातून जात आहे. अशा परिस्थितीत कामचुकार कर्मचारी असो वा अधिकारी, कोणाचीही गय केली जाणार नाही. 

- मारुती खोडके, केडीएमटी व्यवस्थापक.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रम (केडीएमटी) दिवसेंदिवस डबघाईला जात असल्याची टीका होताच केडीएमटीच्या आगार व्यवस्थापक, कार्यशाळा प्रमुख आणि वाहतूक नियंत्रक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 24 तासांमध्ये समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे. तसेच दांडीबहाद्दर वाहक-चालकांच्या पगारकपातीचा आदेश केडीएमटी व्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिला आहे. 

केडीएमटीच्या कल्याणमधील गणेश घाट डेपोला गुरुवारी महापौर विनिता राणे यांनी भेट दिली होती. त्या वेळी वेळेवर बस मिळत नाही, नादुरुस्त बस, घाणीचे साम्राज्य, दांडीबहाद्दर कर्मचारी या बाबी निदर्शनास आल्या. यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना महापौरांनी केडीएमटीचे व्यवस्थापक मारुती खोडके यांना केल्या होत्या. त्याला अनुसरून केडीएमटी वाहतूक नियंत्रक श्‍याम पष्टे, आगार व्यवस्थापक संदीप भोसले आणि कार्यशाळा प्रमुख तृशांत मुळीक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच दांडीबहाद्दरांच्या पगाराला कात्री लावण्याचा आदेश देण्यात आल्यामुळे खळबळ माजली आहे.

 

Web Title: Serious intimidation of KDMT suspension