प्रसूतिगृहात शिरला साप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

चेंबूर नाक्‍याजवळील पालिकेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृहात चार फूट सहा इंचांचा साप आढळला असून कर्मचारी व रुग्णांची भीतीने गाळण उडाली. 

चेंबूर : चेंबूर नाक्‍याजवळील पालिकेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृहात सोमवारी (ता. 21) दुपारी चार फूट सहा इंचांचा साप आढळला. त्यामुळे कर्मचारी व रुग्णांची भीतीने गाळण उडाली. 

सुरक्षिततेसाठी रुग्णालयातील गर्भवती, तसेच प्रसूती झालेल्या महिलांना तत्काळ बाहेर काढत त्यांची सुरक्षा रक्षकांच्या खोलीत व्यवस्था करण्यात आली. रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब सर्पमित्राला पाचारण केले. त्यानंतर तेथे आलेल्या सर्पमित्र सुनील चव्हाण यांनी एक तासानंतर रुग्णालयातील एक कपाटाखालून सापाला मोठ्या शिताफीने पकडले. तो धामण जातीचा बिनविषारी असल्याचे समजले.

सापाला पकडल्यानंतर कर्मचारी व रुग्णांनीही सुटकेचा नि:श्‍वास सोडला. वन विभागाच्या परवानगीने सापाला ठाण्यातील जंगल परिसरात सोडणार असल्याचे सर्पमित्र सुनील चव्हाण यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serpent snake into the maternity ward