उपशाखाप्रमुखाच्या हत्येप्रकरणी सात अटकेत 

उपशाखाप्रमुखाच्या हत्येप्रकरणी सात अटकेत 

मुंबई - उपशाखाप्रमुख सचिन सावंतच्या हत्येप्रकरणी सात जणांना कुरार पोलिसांनी गजाआड केले. हत्येच्या कटातील मुख्य आरोपी, दोन शूटरचा समावेश आहे. लोकेश देवेंद्र सिंग, अभय ऊर्फ बारक्‍या किसन साळुंखे, सत्येंद्र ऊर्फ सोनू पाल, नीलेश शर्मा, बिज्रा पटेल, ब्रिजेश सिंह, अमित सिंह अशी त्यांची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने सोमवार(ता. 14)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एसआरएच्या वादातून सावंतची हत्या झाली असून, हत्येकरिता शूटरसह अन्य साथीदारांना दहा लाखांच्या सुपारीसह अनेक प्रलोभने दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले. 

सावंत हे गोकुळनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रवर्तक होते. 22 एप्रिलला ते जगन्नाथ शर्मासोबत बैठकीसाठी गेले होते. बैठक आटोपून ते घरी जाताना त्यांच्यावर गोळीबार झाला होता. कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. अतिरिक्त आयुक्त राजेश प्रधान, परिमंडळ 12 चे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, सहायक आयुक्त सुभाष वेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक उदय राजेशिर्के यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासावरून सातही आरोपींना विविध ठिकाणांहून अटक केली. शूटर लोकेश, अभय, सत्येंद्र, नीलेश, ब्रिजेश, अमितला उत्तर प्रदेशातून गजाआड केले. त्याच्या चौकशीत बिज्रेश सिंहचे नाव समोर आले. त्याला मालाड येथून ताब्यात घेतले. बिज्रेश आणि नीलेशने सावंतच्या हत्येचा कट रचला. हत्येकरिता दहा लाखांची सुपारी ठरली होती. मारकेऱ्यांना सुरुवातीला तीन आणि हत्येनंतर सात लाख रुपये देण्यात येणार होते. तसेच शूटरसह अन्य साथीदारांना विरार आणि नालासोपारा येथे सदनिका देण्याचे ठरले होते. तसेच कांदिवलीच्या एसआरए प्रकल्पातून आर्थिक फायदाही आरोपींना मिळणार होता. त्यामुळे आरोपींनी सावंतची हत्या केल्याचे कुरार पोलिसांनी सांगितले. बिज्रेश पटेलच्या नेतृत्वाखाली गोकुळनगरमधील सभासद एकत्र आले होते. त्या प्रकल्पाला सावंतचा विरोध होता. त्या दोघांत सहा महिन्यांपासून वाद सुरू होते. 

एक अरोपी फरारी 
उपशाखाप्रमुख हत्ये प्रकरणातील आरोपीकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, मोबाईल, मोटरसायकल, रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. सातही आरोपींच्या चौकशीत एका जणाचे नाव समोर आले आहे. तो फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींनी हत्येकरिता उत्तर प्रदेशहून शस्त्र आणल्याचे पोलिस तपासात उघड झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com