"सेव्हन हिल्स'कडून कराराचे उल्लंघन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

भूखंड परत घेण्याचा महापालिकेचा निर्णय 

मुंबई : सेव्हन हिल्स रुग्णालयाला मरोळ भाडेतत्त्वावर दिलेला मरोळ येथील भूखंड परत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सेव्हन हिल्सने कराराचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. काही वर्षांपासून हे प्रकरण न्याप्रविष्ठ होते. शनिवारी (ता. 16) सर्वोच्च न्यायालयाने याबाबत पालिकेच्या बाजूने निकाल दिल्याने रुग्णालयाचा 77,055 चौरस मीटरचा भूखंड पालिकेला परत मिळणार आहे. 

मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातील रहिवाशांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी मरोळ परिसरातील हा भूखंड पालिकेने सेव्हन हिल्स हॉस्पिटल लिमिटेड आणि सोमा इंटरनॅशनल यांना 30 वर्षांच्या भाडेकराराने दिला होता. 13 डिसेंबर 2013 ला याबाबत सामंजस्य करार झाला होता. 1300 खाटांचे रुग्णालय बांधण्याची अट संबंधित कंपनीला घालण्यात आली होती; मात्र केवळ 306 खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले. त्यात 20 टक्के खाटा पालिकेच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची अट होती.

पालिकेशी झालेल्या करारानुसार भाडे आणि मालमत्ता कर कंपनीने भरणे अपेक्षित होते; मात्र रुग्णालयाने 140 कोटी 88 लाख रुपये थकवले आहे. तसेच, पालिकेच्या रुग्णांना सेवा उपलब्ध न करणे, पालिकेची विविध विभागांची देयके न भरणे, असे प्रकार करून सामंजस्य करारातील अटी व शर्तींचे रुग्णालयाने उल्लंघन केल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. 

पालिकेच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी प्रशासनाने संबंधित कंपनीला "कारणे दाखवा' नोटीस बजावली होती. त्यानंतर हे रुग्णालय भूखंडासह ताब्यात घेऊन सामंजस्य करार रद्द करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. आता न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निर्णय दिल्याने रुग्णालयाची जागा ताब्यात घेणे पालिकेला शक्‍य होणार आहे. 

.......... 

"एम्स'बाबत सकारात्मक 
"बीएआरसी' आणि "अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था' (एम्स) हे रुग्णालय चालवण्यास तयार असल्याचे समजते. एम्सबाबत पालिका सकारात्मक विचार करत आहे. त्याबाबतची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्‍विनी जोशी यांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven Hills violates BMC agreement