जुहूत देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश ; छुप्या खोलीत लपवले महिलांना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

जुहू परिसरात चालणाऱ्या देहविक्रय रॅकेटचा समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता.13) रात्री पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून नदीम सलमानी, मनीष यादव, पिंटू यादव, धनश्‍याम पासवान अशी त्यांची नावे आहेत.

मुंबई : जुहू परिसरात चालणाऱ्या देहविक्रय रॅकेटचा समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता.13) रात्री पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून नदीम सलमानी, मनीष यादव, पिंटू यादव, धनश्‍याम पासवान अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, कुंटणखान्यातील आठ महिलांची पोलिसांनी सुटका करून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. 

जुहू परिसरात देहविक्री सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता.13) रात्री पोलिस निरीक्षक प्रभा राऊळ यांच्या पथकाने कुटुंणखान्याच्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवले. खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा मारून चार जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळाहून काही रक्कम जप्त केली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिला 23 ते 27 वयोगटातील आहे. कारवाईची माहिती जुहू पोलिसांना कळवून त्यांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांना शनिवारी (ता.14) स्थानिक न्यायालयात हजर केले. 

छुप्या खोलीत लपवले महिलांना 

पोलिसांनी छापा मारल्यास महिलांना लपवण्यासाठी कुंटणखान्यात छुपी खोली तयार केली होती. शुक्रवारी झालेल्या कारवाईवेळी खोलीत लपून बसलेल्या सात महिलांना पोलिसांनी बाहेर काढले.

पुरेशी खेळती हवा नसलेल्या खोलीत आणखी काही वेळ महिला लपून बसल्या असत्या तर त्यांच्या जीवावर बेतले असते. काही दिवसांपूर्वी समाजसेवा शाखेने दक्षिण मुंबईतल्या एका बारवर कारवाई केली होती. त्या ठिकाणीही महिलांना लपण्याकरता छुपी खोली तयार केली होती. 
 

 
 

Web Title: Sex Racket Exposed in Juhu Mumbai