व्हिडीओ कॉलवरून लैंगिक चाळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

‘समाजासाठी धोकादायक’
अशा प्रकारची विकृत मनोवृत्ती असलेली व्यक्ती समाजात वावरणे धोकादायक आहे, असे ही तरुणी म्हणते. मी त्याच्यापासून दूर असल्यामुळे तो मला फक्त मोबाईलवरून मानसिक त्रास देऊ शकतो. परंतु, त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या मुली, महिलांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, असे मत तिने व्यक्त केले आहे.

मुंबई - एका तरुणीला व्हिडीओ कॉल करून लैंगिक चाळे करणाऱ्या तरुणाला महिनाभरापासून पोलिस पकडू शकले नाहीत. मोबाईल क्रमांकावरून तो उत्तर प्रदेशात असल्याचे समजले; मात्र पोलिसांना अद्याप त्याच्यावर कारवाई करता आलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या या तरुणीने समाज माध्यमांवरून गाऱ्हाणे मांडले आहे.

वर्सोवा येथे राहणाऱ्या या तरुणीला जुलैमध्ये पहिल्यांदा व्हॉट्‌सॲपवर व्हिडीओ कॉल आला. त्या व्यक्तीने अश्‍लील संभाषण केल्याची तक्रार तिने तत्काळ मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवली. त्यानंतर ३ ऑगस्टला पुन्हा त्याच मोबाईल क्रमाकांवरून या तरुणीला व्हिडीओ कॉल आला. तिने धाडस करून कॉल घेतला, तेव्हा समोरील पुरुष हस्तमैथुन करत होता. 

तिने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून ही माहिती दिली असता, काही वेळातच स्थानिक पोलिस तक्रार घेण्यासाठी येतील, असे सांगण्यात आले. दोन-अडीच तास उटल्यानंतरही पोलिस न आल्यामुळे ४ ऑगस्टला पहाटे या तरुणीने वर्सोवा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. तिला व्हिडीओ कॉल येत असलेला ८८९६९३७९५९ हा मोबाईल क्रमांक उत्तर प्रदेशातील असल्याचे पोलिसांनी शोधून काढले; मात्र कारवाई केली नाही.

त्यानंतर या तरुणीच्या एका मैत्रिणीला याच मोबाईल क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला, त्याचप्रमाणे तक्रारदार तरुणीला होणारा त्रास कमी झाला नाही. काही दिवसांपूर्वी पुन्हा त्याच मोबाईल क्रमाकांवरून तिला कॉल आला. 
परंतु, पोलिस कारवाई होत नसल्याने मंगळवारी या तरुणीने समाज माध्यमांवर गाऱ्हाणे मांडले. त्यामुळे बुधवारी (ता. ४) सकाळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधून कारवाईचे आश्‍वासन दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sex Tricks From Video Calls Crime