लग्नाच्या भूलथापा देऊन 8 वर्षे तरुणीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

कोपरखैरणेत राहणाऱ्या एका तरुणीसोबत मैत्री करत, तिला लग्नाच्या भूलथापा देऊन 8 वर्षे अत्याचार करणाऱ्या तरुणाला कोपरखैरणे पोलिसांनी ओरिसातून अटक केली.

कोपरखैरणेत राहणाऱ्या एका तरुणीसोबत मैत्री करत, तिला लग्नाच्या भूलथापा देऊन 8 वर्षे अत्याचार करणाऱ्या तरुणाला कोपरखैरणे पोलिसांनी ओरिसातून अटक केली. आरोपी कुंजबिहारी अर्जुन मेहेर (33) हा लग्न न करता पीडितेला मारहाण करून ओरीसात पळून गेला होता. न्यायालयाने त्याची 2 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. 

या घटनेतील 37 वर्षीय पीडित तरुणी 9 वर्षांपूर्वी दिल्ली येथून नवी मुंबईत कोपरखैरणे येथे राहण्यास आली होती. त्या वेळी आरोपी कुंजबिहारी मेहेर हा नवी मुंबईत इस्टेट एजंटचे काम करत होता. त्याची पीडित तरुणीसोबत ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर त्याने पीडित तरुणीला लग्नाच्या भूलथापा देऊन 8 वर्षे लैंगिक अत्याचार केले. मात्र पीडित तरुणीने कुंजबिहारी याच्या पाठीमागे लग्न करण्यासाठी तगादा लावल्यानंतर त्याने पीडित तरुणीसोबत लग्न करण्यास नकार देऊन, तिला मारहाण केली व तो ओरिसा येथे आपल्या मूळ गावी पळून गेला. त्यामुळे पीडित तरुणीने कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी कुंजबिहारी याच्यावर बलात्कारासह मारहाण करणे, धमकी देणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता.

तपासादरम्यान आरोपी कुंजबिहारी हा ओरिसा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गत 25 जुलै रोजी सहायक पोलिस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांचे पथक भुवनेश्वर येथे आरोपीच्या शोधात गेले होते. त्या ठिकाणी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास आरोपी कुंजबिहारी याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन तेथील न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर पोलिसांनी तेथील न्यायालयाकडून 4 दिवसांचे ट्रान्झीट रिमांड घेउन त्याला नवी मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्याला सीबीडी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 2 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गंगाधर देवडे यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sexual abuse by close friends in navi mumbai