दादागिरी फळली ; ‘शहीद भाई कोतवाल’ चित्रपटाचे सर्व खेळ दाखविणार !

‘शहीद भाई कोतवाल’ चित्रपटाचा एकमेव खेळ दाखविल्‍याने चित्रपटगृहाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
‘शहीद भाई कोतवाल’ चित्रपटाचा एकमेव खेळ दाखविल्‍याने चित्रपटगृहाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

मुंबई : हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील, गोमाजी पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘शहीद भाई कोतवाल’ चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नसल्याने कर्जत तालुक्‍यात वातावरण तापले आहे. कर्जत येथील राजनोव्‍हा चित्रपटगृहात एकमेव खेळ असल्‍याने चित्रपटगृहाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्‍यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अखेर चित्रपटगृहाचे मालक मोहनराज यांनी कार्यकर्त्यांच्‍या भावना समजून घेत यापुढे ‘शहीद भाई कोतवाल’चित्रपटाचे सर्व शो दाखविण्‍याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कर्जत आणि नेरळमधील चित्रपटाचा पहिला खेळ हाऊसफुल झाला. स्वरजाई प्रोडक्‍शनचे निर्मिती असलेला ‘शहीद भाई कोतवाल’ चित्रपट राज्यातील १६१ चित्रपटगृहांत प्रसिद्ध झाला. या दोन्ही हुतात्म्यांची कर्मभूमी असलेल्‍या कर्जत आणि नेरळमध्ये चित्रपटाचा पहिला खेळ हाऊसफुल्ल झाला आहे.

शहीद भाई कोतवाल आणि तान्हाजी या दोन्ही चित्रपटाचे प्रदर्शन करणारी संस्था एकच आहे. त्यात ‘तान्हाजी’ सुपरहिट झाल्याने त्या चित्रपटाला बाजूला करून‘शहीद भाई कोतवाल’चित्रपट दाखवण्याचे धाडस पहिल्या आठवड्यात करण्‍यात आलेले नाही. त्यामुळे शुक्रवारी पहिल्या दिवशी या दोन्ही हुतात्म्यांची कर्मभूमी असलेल्या कर्जत तालुक्‍यात चित्रपटगृह मिळाले नसल्याने गोंधळ उडाला होता.

कर्जत येथील राजनोव्हा चित्रपटगृहात सकाळी १० वाजता खेळ ठेवण्यात आला. सकाळी आणि तोही एकमेव खेळ यामुळे तालुक्‍यातील कार्यकर्ते संतापले होते. शुक्रवारी सकाळी १० वाजता असलेला खेळ एक तास उशिरा सुरू करण्यात आला. कार्यकर्त्यांनी राजनोव्हा चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी केल्याने काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. त्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमल्याने ११ वाजता खेळ सुरू झाला.

चित्रपटाचे मालक मोहनराज यांनी तेथे उपस्थित कार्यकर्त्यांच्‍या भावना समजून घेत यापुढे‘शहीद भाई कोतवाल’ चित्रपटाचे सर्व खेळ दाखविण्यास तयार असून, प्रसारण हक्क असलेल्या कंपनीने त्यावर निर्णय घेतल्यास आपली कोणतीही हरकत नाही, अशी भूमिका घेतली आहे.

स्थानिकांची मागणी लक्षात घेऊन या आठवड्यात कर्जत चित्रपटगृहामधील सर्व खेळ ‘शहीद भाई कोतवाल’या चित्रपटाचे दाखविण्याची तयारी दाखवली आहे. तसा संदेश चित्रपट प्रसारित करणाऱ्या कंपनीकडे पाठवला आहे. विद्यार्थ्यांना हा चित्रपट स्वतः दाखविणार आहेत.
- मोहन राज, मालक, राजनोव्हा टॉकीज 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com