म्हणून राष्ट्रवादीनं पाठिंब्याचं पत्र दिलं नाही; पवारांचा खुलासा 

टीम ई-सकाळ
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही 'मी पहिल्यांदा काँग्रेसशी बोलेन,' असं स्पष्ट केलंय. 

मुंबई : राष्ट्रवादी-शिवसेना यांनी यापूर्वी एकत्र कधी सरकार चालवलेलं नाही. त्यामुळं बऱ्याच गोष्टी आहेत. त्याची स्पष्टता व्हायला हवी. आम्ही काँग्रेससोबत निवडणूक लढवली होती. त्यामुळं सरकार स्थापने संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो काँग्रेसशी चर्चा करूनच घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी आज सकाळी सांगितले. सिल्वर ओक निवासस्थानी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी काल राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र का दिलं नाही, यावरही अजित पवार यांनी यावेळी खुलासा केला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही 'मी पहिल्यांदा काँग्रेसशी बोलेन,' असं स्पष्ट केलंय. 

राष्ट्रवादी काँग्रेसचं कसब पणाला; काय घडणार महाराष्ट्राला उत्सुकता

काँग्रेसशी चर्चा करूनच निर्णय 
अजित पवार म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादीने 15 वर्षे सरकार चालवले. त्यावेळी आमच्यात अंडरस्टँडिंग होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी पहिल्यांदा सरकार स्थापन करत आहेत. त्यामुळं अनेक बाबींवर आधीच चर्चा व्हायला हवी. दोन्ही पक्षांनी एकत्र कधीच काम केलेलं नाही. तसच आम्हाला काँग्रेसशीही बोलावं लागेल. किमान समान कार्यक्रम ठरवावा लागले आणि त्यानंतरच सत्ता स्थापनेची सूत्र पुढं सरकतील. स्थिर सरकार चालवायचं असेल तर, हे करावं लागेल कारण, मतदार प्रश्न विचारतील. मुळात सरकार म्हणजे, सोपी गोष्ट नाही अनेक मुद्दे असतात. खाती कशी चालतील विभाग कसे चालतील. या सगळ्याचा विचार करायला लागतो. पण, काँग्रेसशी चर्चा केल्यानंतर जे काही निष्पन्न होईल तो आमचा निर्णय असेल.'

कोशीश करने वालोंकी हार नही होती, राऊतांचे लिलावतीतून ट्विट

राष्ट्रवादीनं का पत्र दिलं नाही? 
राष्ट्रवादी काँग्रेसनं काल शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र का दिले नाही? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अजित पवार म्हणाले, 'काल संध्याकाळी आम्हीही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो पण, काँग्रेसनं पत्र दिलं नाही. त्यामुळं आमचं पत्र देऊनही काही झालं नसतं. आम्हाला या सगळ्या विषयावर काँग्रेसशी चर्चा करण्यासाठी वेळ हवा होता. काँग्रेस नेते जयपूर, दिल्लीत असल्यामुळे ही चर्चा होऊ शकली नाही. आज, आमची संयुक्त बैठक होईल त्यानंतर संपूर्ण निर्णय आम्ही जाहीर करू.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar ajit pawar gives reason for not sending support letter to shivsena