संकटाचा सामना करण्यास सज्ज रहा : शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 मे 2019

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना सरकारच्या दिरंगाईने माणसे व जनावर हैराण झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली.

मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना सरकारच्या दिरंगाईने माणसे व जनावर हैराण झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली. दुष्काळाचा सामना करण्यासाठीचा आराखडाच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

शरद पवार यांनी आज पक्षाचे प्रमुख नेते व दुष्काळी जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दुष्काळी भागातल्या जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाच्या योजनांची अंमलबजावणी करून घेण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, प. महाराष्ट्रातील जिल्ह्यांत दुष्काळाचे थैमान सुरू झाले आहे. यासाठी सरकारने तातडीने पिण्याचे पाणी, लोकांना रोजगार, चारा छावण्या व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देण्यासाठीच्या उपायोजना हाती घ्यायला हव्यात, असे आवाहन पवार यांनी केले.

दुष्काळामुळे वर्षानुवर्षे जोपासलेल्या फळबागांना पाणी नाही मिळाले, तर संबंधित शेतकऱ्यांचे दहा बारा वर्षांचे नुकसान होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना फळबागांना जगविण्यासाठी हेक्‍टरी 35 हजार रुपयांची मदत करण्यात आली होती. मात्र, या वेळी डिसेंबरमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यानतंरही सरकारने फळबागा वाचवण्यासाठीच्या उपायोजना केलेल्या नाहीत. सरकारने फळबागांसाठी तातडीने अनुदान द्यावे, चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची "राष्ट्रवादी'चे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

सरसकट जनावरे छावणीत घ्या 
सध्या काही ठिकाणी सरकारने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. मात्र, एका शेतकऱ्याची केवळ पाच जनावरेच छावणीत घेतली जात आहेत हे अनाकलनीय असल्याचे शरद पवार म्हणाले. त्यामुळे, शेतकऱ्यांची सरसकट जनावरे छावणीत घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

प्रति जनावरांना दरदिवशी 90 रुपये देण्यात येणारे अनुदानदेखील अपुरे असल्याचे पवार म्हणाले. सध्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता येत नाही. त्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय घ्यावा व कर्जाची सुरू असलेली वसुली पूर्णत: स्थगित करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. राज्य सरकारने आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील पवार यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar asks NCP workers to be prepared for drought situation in Maharashtra