निधी चौधरींवर कारवाई करा; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 2 जून 2019

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केलेल्या अधिकारी निधी चौधरी यांच्यावर कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. निधी चौधरी यांनी 17 मेला महात्मा गांधीविषयी वादग्रस्त ट्विट केले होते. महात्मा गांधींविषयी ट्वीट करताना निधी यांनी महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांना धन्यवाद दिले. 

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केलेल्या अधिकारी निधी चौधरी यांच्यावर कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. निधी चौधरी यांनी 17 मेला महात्मा गांधीविषयी वादग्रस्त ट्विट केले होते. महात्मा गांधींविषयी ट्वीट करताना निधी यांनी महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांना धन्यवाद दिले. 

निधी चौधरी यांनी ट्विट केले होते की, महात्मा गांधी यांची 150वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आता वेळ आली आहे. ज्या रस्ते, संस्थांना गांधीचे नाव दिले आहे, ते काढण्यात यावे, जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत तसेच नोटेवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 30-1-1948 साठी थँक्यू गोडसे, अशा आशयाचे वादग्रस्त ट्विट निधी चौधरी यांनी केले होते.

मुंबई महानगर पालिकेच्या उपायुक्तपदी कार्यरत असलेल्या अधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150व्या जयंती निमित्ताने भारतीय चलनातील नोटांवरील या महामानवाचे चित्र काढून टाकावे व जगातील त्यांचे पुतळे हटवावेत, असे धक्कादायक विधान सोशल मीडियावर केल्याचे समजते. या विधानात महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरणही करण्यात आले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शासकीय अधिकार्‍याकडून असा प्रमाद घडावा व शासनाने त्याकडे काणाडोळा करावा हे अशोभनीय आहे. शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकार्‍याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे केवळ लांछनास्पद नसून सक्त कारवाईस पात्र आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून या अधिकार्‍यावर कडक कारवाई करावी, असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar Demand To Take Strict Action Against Nidhi Choudhary