'पवारांना आलेली नोटीस सुप्रिया ताईंच्या १० एकराच्या शेतातल्या ११३ कोटी रुपयांच्या वांग्या एवढी खरी'

पूजा विचारे | Thursday, 24 September 2020

नोटीस देण्यासाठी कोणताही आदेश देण्यात आला नव्हता असं स्पष्टिकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे.  तर दुसरीकडे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. 

मुंबईः मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी म्हटलं की, प्राप्तिकर विभागानं आपल्याला नोटीस बजावली आहे. प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून नोटीस बजावून राजकीय विरोधकांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही पवारांनी केला. यावर शरद पवारांनी केलेले आरोप निवडणूक आयोगानं फेटाळलेत. तसंच नोटीस देण्यासाठी कोणताही आदेश देण्यात आला नव्हता असं स्पष्टिकरण निवडणूक आयोगानं दिलं आहे.  तर दुसरीकडे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. 

सुप्रिया ताईंच्या १० एकराच्या शेतातील ११३ कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच पवारांना आलेली नोटीस, असा टोला त्यांनी पवारांना लगावला आहे. 

कलियुगातील हरिश्चंद्र श्री शरदचंद्र पवार यांनी आपल्याला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस आल्याचा दावा केला होता. अशी कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचे आज स्पष्ट करण्यात आलं आहे. सुप्रिया ताईंच्या १० एकराच्या शेतातील ११३ कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच पवारांना आलेली नोटीस, असं भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं होतं. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पवारांवर टीका केली आहे. 

शरद पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

२००९, २०१४ आणि २०२० मधील निवडणुकांमधील प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेल्या माहितीवरून प्राप्तिकर विभागानं आपल्याला नोटीस बजावली आहे. त्या नोटिसीला लवकरच उत्तर देऊ, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. या नोटिसवर बोलताना पवार म्हणाले की, संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आम्हाला आनंद वाटतो. असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला होता. 

सोमवारी आपल्याला नोटीस मिळाली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनाही नोटीस बजावण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनाही नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत, असं पवार म्हणाले. तसंच राजकीय विरोधकांना प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून नोटीस बजावून त्यांच्यावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवारांनी पत्रकार परिषदेत केला होता. 

ही नोटीस निवडणूक आयोगाच्या सूचनेवरुन बजावण्यात आली आहे. उत्तर देण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन १० हजार रुपये दंड आकारला जाईल, असंही त्या नोटीसमध्ये नमूद केलं आहे. यामुळे मी लगेचच या नोटिसला उत्तर देणार असल्याचं पवारांनी सांगितलं. 

पवारांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं काय म्हटलं?

भारतीय निवडणूक आयोगाकडून केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला शरद पवारांना नोटीस बजावण्यासाठी कोणताही प्रकारचा आदेश दिला नव्हता, असं निवडणूक आयोगाने निवेदन प्रसिद्ध करत स्पष्ट केलं आहे. 

sharad pawar income tax notice election commission atul bhatkhalkar criticize