राष्ट्रवादीच्या 'मिशन घरवापसी'बद्दल समजताच भाजपनं दिली 'ही' प्रतिक्रिया

पूजा विचारे
Friday, 14 August 2020

राष्ट्रवादीकडून राज्यात 'मिशन घरवापसी' राबवण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या मिशन घरवापसीवरुन भाजपनं पलटवार केला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीच्या मिशनवर टीका केली आहे.

मुंबईः शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच वाद उफाळून आला आहे. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र आता निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु करण्यात आलेत. भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घेत राष्ट्रवादीकडून राज्यात 'मिशन घरवापसी' राबवण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या मिशन घरवापसीवरुन भाजपनं पलटवार केला आहे. 

भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीच्या मिशनवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आधी आपलं घर सांभाळावं आणि नंतर भाजपवर बोलावं, असं म्हणत शेलारांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. पुढे शेलार म्हणाले की, आपला पक्ष फुटू नये म्हणूनच राष्ट्रवादीचे नेते अशा पद्धतीने अफवा पसरवत आहेत. 

हेही वाचाः राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं मिशन, 'या' बड्या नेत्यांकडे सोपवली जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या घरातला भेद आणि विसंवाद  लपवण्यासाठी भाजपचे आमदार राष्ट्रवादीत परत येणार अशा अफवा पसरवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून अतिशय योजनाबद्ध पद्धतीने सुरु आहे. या प्रयत्नाला कोणतंही यश मिळण्याची शक्यता दुरान्वयेही नाही, असं शेलार म्हणालेत. 

यावेळी शेलारांनी खोचक टोलाही लगावला आहे. ते म्हणाले की, जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात जरी संवाद साधला तरी खूप आहे. स्वतःचं सरकार आणि स्वतःचा पक्ष आधी वाचवा. भाजप पक्षाला कोणाचाही परिवार फोडण्याची इच्छा नाही आणि ना सरकार पाडापाडीत पक्षाला रस आहे, असंही शेलारांनी स्पष्ट केलं आहे. 

राष्ट्रवादीचे मिशन घरवापसी

राष्ट्रवादी काँग्रेस मिशन घरवापसी राबवणार आहे. महाराष्ट्रात निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना राष्ट्रवादी पक्षात परत घेणार आहे. गयारामांना पुन्हा पक्षात घेण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे सोपवल्याचंही बोललं जात आहे. या सगळ्यावर आता राष्ट्रवादीकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

अधिक वाचाः आजोबांच्या वक्तव्यावर पार्थ पवार नाराज?, जयंत पाटील यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

2019 विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली होती. विकासाची काम करण्यासाठी भाजपमध्ये जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता महाविकास आघाडी सरकार आल्यावर या नेत्यांना परत राष्ट्रवादीत परत यायचं आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली.

sharad pawar ncp mission ghar wapsi bjp mla ashish shelar react twitter video


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar ncp mission ghar wapsi bjp mla ashish shelar react twitter video