Sharad Pawar : फोडाफोडीच्या राजकारणाला चपराक; शरद पवार यांचा भाजपला टोला; महाविकास आघाडीला बळ मिळणार

कर्नाटकात जे काँग्रेस आणि जनता दलाचे सरकार होते ते सरकारही काँग्रेसचे आमदार फोडून घालवले.
sharad pawar over bjp loss in karnataka election 2023 congress won politics
sharad pawar over bjp loss in karnataka election 2023 congress won politicsesakal

मुंबई : ‘‘जनतेने भाजपच्या विरोधात काठावरचा कौल दिला तर केंद्रातील सत्ता आणि यंत्रणा यांचा वापर करून दुसरे पक्ष फोडून सत्ता स्थापन करण्याचे प्रकार भाजपने केले. याचाच राग म्हणून आज कर्नाटकच्या जनतेने भाजपला सपशेल नाकारत काँग्रेसला बहुमतापेक्षाही अधिक जागी विजयी करून भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला चपराक दिली,’’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी लगावला.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये माध्यमांशी बोलतना ते म्हणाले की, अलीकडच्या काळात भाजपने जिथे त्यांचे राज्य नाही त्याठिकाणचे आमदार फोडून तेथील राज्य घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी सत्तेचा वापर करणे हे सूत्र त्यांनी ठिकठिकाणी वापरले. कर्नाटकातसुद्धा त्यांनी हाच प्रयोग केला.

कर्नाटकात जे काँग्रेस आणि जनता दलाचे सरकार होते ते सरकारही काँग्रेसचे आमदार फोडून घालवले. जसे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी केले तेच कर्नाटकमध्ये झाले होते. मध्य प्रदेशातही आमदार फोडून कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात आले.

गोव्यातही भाजपने तेच केले. यंत्रणा आणि साधनसंपत्ती वापरुन सरकार पाडण्याची ही एक नवीन पद्धत सुरु झाली आहे, ही गोष्ट चिंताजनक आहे. मात्र, फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही, ही गोष्ट कर्नाटकच्या निकालाने दाखवून दिली.

‘‘कर्नाटकमध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा दुप्पट जागांवर यश आले आहे. याचा अर्थ भाजपचा सपशेल पराभव करण्याची भूमिका कर्नाटकच्या जनतेने घेतली. याचे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार, सत्तेचा, साधनांचा गैरवापर आणि लोक फोडून आपण राज्य करू शकतो,

याविषयी सत्ताधाऱ्यांना असलेल्या विश्वासाविरोधात जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली,’’ असे पवार यांनी स्पष्ट केले. देशामध्ये ज्या पद्धतीने धर्म आणि जातीच्या नावाने चुकीचे वातावरण पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांना कर्नाटकच्या जनतेने आज धडा शिकवला, असा टोला लगावत आता ही प्रक्रिया संबंध देशात होईल. असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

देशात २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होतील तेव्हा देशात काय चित्रे असू शकते, याचा अंदाज कर्नाटकच्या निवडणुकीतून करू शकतो. कर्नाटकच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा उपयोग झाला असे म्हणता येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

मविआची दोन दिवसांत बैठक

कर्नाटकच्या निकालानंतर राज्यातील भाजपविरोधी महाविकास आघाडीला बळ आल्याचे चित्र आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात आमच्या पक्षाची बैठक बोलवली. मी स्वतः उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याविषयी चर्चा करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असे आम्ही एकत्र बसून पुढची आखणी आतापासूनच करावी, हा विचार माझ्या मनात आहे. त्याबाबत मी सर्वांशी बोलणार आहे. दोन दिवसांनतर आम्ही महाविकास आघाडीची एकत्रित बैठक घेऊन आगामी रणनितीबाबत चर्चा करू, असे पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com