'एमसीए' अध्यक्षपदाचा शरद पवार यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेचा मान राखून अध्यक्षपदाचा राजीनामा व्यवस्थापकीय समितीकडे सुपूर्त केला असून, त्यावर कोणता निर्णय घेता येईल याचा विचार करावा लागेल.
- व्ही. पी. शेट्टी, एमसीएचे अतिरिक्त सचिव

मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) व्यवस्थापकीय समितीच्या शनिवारी झालेल्या तातडीच्या बैठकीत शरद पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका यावर चर्चा करण्यासाठी मुंबईत आज एमसीएच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक झाली. बैठकीत शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रक व्यवस्थापकीय समितीकडे सुपूर्त केले. आता व्यवस्थापकीय समिती शरद पवार यांच्या राजीनाम्यावर कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

लोढा समितीच्या शिफारशींनुसार शरद पवार एमसीएचे अध्यक्ष भूषविण्यास अपात्र ठरतात. क्रिकेट संघटनेचा पदाधिकारी 70 वर्षांपेक्षा कमी वयाचा असावा आणि एका पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त दोन टर्मपेक्षा अधिक कालावधीसाठी पदाधिकारी होता येणार नाही, अशी शिफारस लोढा समितीने दिलेल्या अहवालात आहे. शरद पवार यांचे वय 76 वर्षे असून, ते याआधी दोन वेळा त्यांनी एमसीएचे अध्यक्षपद भूषविले आहे.

Web Title: sharad pawar resign to mca chairman