
Chhatrapati Shivaji Maharaj : खिळ्यांपासून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा
डोंबिवली - डोंबिवली मधील श्रद्धा पाटील या तरुणीने खिळे आणि धाग्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती साकारली आहे. यासाठी तिने तब्बल 300 खिळ्यांचा व 4 हजार धाग्यांचा वापर केला आहे.
डोंबिवली मधील तरुणी श्रद्धा पाटील हिला लहानपणा पासूनच कलेची आवड आहे. तसेच श्रद्धा ही शिवप्रेमी असून दरवेळी अनोख्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारत असते. यंदा तिने चक्क खिळे आणि धाग्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारली आहे.
यासाठी तिला 7 दिवसांचा कालावधी लागला असून कोणाचीही मदत न घेता तिने 300 खिळे आणि 4 हजार धाग्यांच्या साहाय्याने 2 बाय 2 वर्तुळात महाराजांची प्रतिकृती साकारली आहे. यापूर्वी श्रद्धाने माचिस काड्यांपासून शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली होती.

19 हजार 800 माचीस काड्यांचा वापर करीत 10 बाय 10 फुटांची प्रतिमा तिने 36 तासात साकारली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, पुण्यतिथी, राज्याभिषेक दिन आदि दिनी केवळ आठवण न काढता त्यांचे स्मरण कायम केले गेले पाहीजे. याच भावनेतून ही प्रतिमा मी साकारत असल्याचे श्रद्धा सांगते. यापुढे आणखी मोठ्या आकारातील प्रतिमा साकारण्याचे माझे लक्ष असल्याचे श्रद्धाने सांगितले.