'अच्छे दिना'ची शेकापला अपेक्षा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 जानेवारी 2017

मुंबई - राज्यात रायगड व सांगोल्याच्या पलीकडे राजकीय प्रवाहातून गायब झालेल्या शेतकरी कामगार पक्षाला यंदा मात्र "अच्छे दिन' येण्याची आशा आहे. संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या प्रवेशामुळे शेकापचा झेंडा राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात उतरविण्याची तयारी पक्षाने केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्ष स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचे गायकवाड यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

राज्यात शेकापची शक्‍ती दिसत नसली, तरी बहुतांश जिल्ह्यांत शेकापचा विचार मात्र कायम असल्याचा दावा केला जात आहे. त्यात उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, जालना व लातूर या जिल्ह्यांवर शेकाप अधिक लक्ष केंद्रित करण्याची शक्‍यता आहे. गायकवाड यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे बहुतांश कार्यकर्ते शेकापमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या संघटनेचा राजकीय लाभ या निवडणुकीत होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. ग्रामीण भागात शेतकरी तर शहरी भागात कामगार क्षेत्रावर आधारित शेकापचे संघठन मजबूत करण्याचा अजेंडा पक्षाने निश्‍चित केला आहे.

Web Title: shekap party expect good day