सोशल मीडियावर शेकापची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

भाजप फक्त दिशाभूल करून मते मागत आहे. १० वर्षे नगरपालिका ताब्यात असूनसुद्धा कामे केली नाहीत, हे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

-विवेक पाटील, माजी आमदार 

नवीन पनवेल - शेकापने सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे या पक्षाने शहरातील नागरी समस्या या माध्यमातून मांडत प्रभावी मांडण्यास सुरुवात केली आहे. शेकापचे आव्हान कसे पेलणार, याबाबत भाजपमध्ये विचारमंथन सुरू असल्याचे समजते. पनवेल पालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी हायटेक प्रचाराला सुरुवात केली आहे. शेकापने त्याही पुढे जाऊन पनवेल शहराच्या मूलभूत समस्या सोशल मीडियासमोर आणल्या आहेत. विकासाच्या नावाने मते मागणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आत्तापर्यंत पनवेलच्या विकासासाठी काय केले, हे नागरिकांसमोर मांडले आहे.राजकीय पक्षांनी प्रचारासाठी योजलेल्या नवनव्या क्‍लृप्त्या या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहेत. आकर्षक फलकाप्रमाणेच फेसबुक, व्हॉट्‌सअॅपसारख्या सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात झाली आहे. निवडून दिल्यास कोणत्या सुधारणा केल्या जातील किंवा आमचा पक्ष कशा पद्धतीने काम करेल, हे मतदारांना पटवण्यासाठी बॅनरबाजी केली जात आहे. 

सध्या भाजपमध्ये असलेले पूर्वी काँग्रेस पक्षात होते. नगरपालिकेवर त्यांचीच सत्ता होती. असे असताना आजही शहरात कचऱ्याची, झोपडपट्टी पुनर्वसन, पाणीप्रश्न आदी समस्या ‘जैसे थे’ आहेत. इतके वर्षे सत्तेत असून त्यांना त्यावर ठोस उपाय करता आलेला नाही. निवडणूक जिंकण्यासाठी पनवेलच्या विकासाचा मुद्दा पुन्हा नागरिकांसमोर आणून मते मागितली जात असल्याचा आरोप शेकाप आघाडीने केला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी काय कामे केली आहेत, याचेच फलक आघाडीतर्फे सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. 

केलेल्या कामांचे फलक आम्ही शहरात लावले आहेत. दहा वर्षे आम्ही सत्तेत होतो, तेव्हा आघाडीमधील पक्षसुद्धा सत्तेत होते. आतापर्यंत ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. दहा टक्के राहिलेली कामे पूर्ण करू.
-प्रशांत ठाकूर, आमदार

Web Title: shetkari kamgar party lead on social media